पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये भारत सरकारच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियान अर्थात ’स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शास्त्रशुद्ध हात धुणे प्रात्यक्षिक आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तर द्रौपदी वर्तक यांनी निवडक विद्यार्थ्याच्या सोबतीने शास्त्रीय पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि वैयक्तीक स्वछतेचे महत्व पटवून दिले. ’स्वछता ही सेवा’ अभियानांतर्गत विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धात्मक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्राचार्या साधना डोईफोडे यांनी केंद्र सरकार राबवत असलेले हे अभियान विद्यार्थी केंद्रित झाल्यास अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी दक्षता वर्तक या इ. 5वीत शिकणार्या चिमुकलीने स्वछतेचे महत्व सांगताना निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असल्याने स्वआरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन केले. या वेळी झालेल्या वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.