उरण ः वार्ताहर
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी नव्याने स्थापन झालेल्या मेजर पोर्ट अॅक्टनुसार बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 12 सदस्यांपैकी सात सदस्यांच्या नियुक्तया केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाचे जांईट सेक्रेटरी विक्रम सरकार यांनी जाहीर केल्या आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टऐवजी आता नव्याने मेजर पोर्ट अॅक्ट अस्तित्वात आला आहे. त्यामुळे जुना अस्तित्वात असलेला 17 सदस्यांचा बोर्ड संपुष्टात आला आहे. मेजर पोर्ट अॅक्टप्रमाणे आता बोर्ड ऑफ ट्स्टीची संख्या 17 वरून 12 करण्यात आली आहे. या 12 ट्रस्टीपैकी शासन नियुक्त ट्रस्टींची संख्या 10, तर कामगार ट्र्स्टींची संख्या दोन आहे. मेजर पोर्ट अॅक्ट अस्तित्वात आल्याने आता केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाने सात शासन नियुक्त ट्रस्टीच्या नियुक्त्या अध्यादेश काढून जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाचे जांईट सेक्रेटरी विक्रम सरकार यांनी जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये जेएनपीटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच सदस्यपदी सेंट्रल रेल्वेचे फ्राईट,ट्रान्सपोर्ट मॅनेजर, सरंक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य नौदल विभागाचे इन्चार्ज अधिकारी व पीएसडब्यू विभागाचे जाइंट सेक्रेटरी भूषण कुमार आदी सात सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, बोर्ड ऑफ ट्रस्टींचा कालावधी दोनवरून तीन वर्षांचा करण्यात आला आहे. अप्रशासकीय तीन ट्रस्टींच्या नियुक्त्या येत्या काही दिवसांतच होणार आहेत, तर दोन कामगार ट्र्स्टींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.