मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीमधील किमान शंभर विद्यार्थी रोज नांदगाव हायस्कूलमध्ये जातात. मात्र बस उपलब्ध नसल्याने त्यांना शाळेच्या वेळेत पोचता येत नव्हते. मुरूड आगाराने रोज सकाळी 9.30 वाजता मुरूड-नांदगाव बस सुरू केली आहे. या गाडीचा विहूर, मोरे परिसरातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विहूर ग्रामपंचायत हद्दीमधील विद्यार्थ्यांना नांदगाव हायस्कूलमध्ये वेळेवर पोचता येत नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. शाळेच्या वेळेत एसटी बस सुरू करावी, यासाठी विहूर ग्रामस्थांनी मुरूड आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन आगार व्यवस्थापकांनी दररोज सकाळी 9.30 वाजता मुरूड-नांदगाव बस सुरू केली आली आहे. या गाडीचा शुभारंभ ग्रामस्थ नरेश दिवेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या वेळी ग्रामस्थांनी आगार प्रमुखांचे आभार मानले. या बसमुळे विहूर, मोरे परिसरातील विद्यार्थीची सोय झाली आहे.