पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील आरोग्य सेवा समिती (योग केंद्र)तर्फे नुकताच रथसप्तमी उत्सव साजरा झाला. या उत्सवांतर्गत 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. सीकेटी विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा 27 जानेवारीपासून सूर्यनमस्कार करण्याचा सराव घेतला गेला. 1 ते 7 फेब्रुवारीदरम्यान विद्यालयात 83 विद्यार्थ्यांनी शारिरिक शिक्षण विषयाचे शिक्षक भरत जितेकर, अशोक पाटील, प्रकाश रिसबुड या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध सूर्यनमस्कार घातले. या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण तसेच योगकेंद्रातर्फे सतीश देशमुख, नयना म्हात्रे, नेहा वेदक, श्रद्धा मोरे, सुलभा मोरे या प्रतिनिधींनी ऑनलाइन सहभाग घेतला. 83 विद्यार्थ्यांनी एकूण 12 हजार 803 सूर्यनमस्कार घातले. ‘भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या या उपक्रमात पनवेलच्या नागरिकांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला. यात खारीचा वाटा उचलत आमच्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे भाग घेतला याचा विशेष आनंद होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुद़ृढ आरोग्यासाठी रोज सूर्यनमस्कार घालणे यासारखा सर्वांगसुंदर व्यायाम दुसरा नाही. म्हणूनच विद्यालयात अशा उपक्रमांना आम्ही प्राधान्य देतो’, असे या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक करीत अभिनंदन केले.