पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरात येत्या 1 डिसेंबर रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच 42 किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 20) मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलच्या स्पाईस वाडीत डिजिटल पद्धतीने करण्यात आले. याचबरोबर या स्पर्धेशी संबंधित वेबसाईट पेजचे प्रकाशन होऊन रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीही सुरू झाली.
या वेळी आपल्या छोटेखानी भाषणात पनवेल शहराचे महत्त्व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पटवून देऊन या मॅरेथॉनसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्याचे गरजेचे असल्याचे म्हटले, तर डॉ. कल्याण पाटील यांनी आरोग्याच्या दृष्टीने धावण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास रनर अजित कंबोज, स्पर्धेचे आयोजक सुरेश रिसबूड, प्रफुल वाझे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार ठाकूर यांनी केले.
आगामी काळात या स्पर्धेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत. याची माहिती वेळोवेळी देण्यात येईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या मॅरेथॉनसाठी नोंदणी करायची असल्यास indiarunning आणि Townscriptवर ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …