नवी मुंबई : वृत्तसंस्था
सायन-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नवी मुंबई महापालिकेला सातत्याने नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरच काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे तासन्तास तिष्ठावे लागत आहे. यावर उपाय म्हणून महामार्गावरील डांबरीकरणाच्या जागी काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मध्यंतरी पावसामुळे शिल्लक कामे सुरू करण्यात आली आहेत. नियोजित काम पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
महामार्गावरील संपूर्ण कामासाठी एकूण 68 कोटींचा खर्च अपेक्षित होता, परंतु वाढीव कामांमुळे हा खर्च 108 कोटींवर पोहोचला आहे. पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कामासाठी मोठी कसरत करावी लागली असली, तरी वाहकूकोंडीला सामोरे जावेच लागले, परंतु पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा येणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली होती, पण अर्धवट कामामुळे ज्या ठिकाणचे काँक्रिटीकरणाचे काम झाले नाही, त्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या.