
पनवेल : प्रतिनिधी
कोरोनामुळे मावा, पान, गुटखा, गांजा, आणि दारू यांची होम सर्व्हिस नवीन पनवेलसह काही भागात सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अत्यावश्यक सेवेप्रमाणे या अमली पदार्थांची विक्री घरातून होत आहे. राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यानी नवीन पनवेल परिसरातून एका घरातून 10 बॉक्स विमल, रजनीगंधा, गुटखा जप्त करून खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. कोरोनापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी पोलीस आपला घरदार सोडून जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे आहेत. यासाठी सर्व पोलीस दल बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा या बेकायदेशीर धंदेवाल्यानी घेतला आहे. राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांना नवीन पनवेल ए टाईप परिसरात एका घरामध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी जाऊन विमल, गुटखा, रजनीगंधाचे जवळपास 10 बॉक्स गुटखा जप्त करीत खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिला.