रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना पलटवार
नागपूर : प्रतिनिधी
आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही, तर शिवसेनेनेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्यात केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
आमच्यासोबत निवडणूक लढवून त्यांनी महाराष्ट्रभर मते मागितली आणि ऐन सत्तास्थापनेच्या वेळी दगाफटका करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या विचारधारा न पटणार्या पक्षांसोबत जाऊन सत्ता मिळविली. केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची येवढेच त्यांचे लक्ष्य होते, तर राज्याचा विकास हे आमचे लक्ष्य होते. हा दगाफटका करून शिवसेनेने केवळ आमच्याच पाठीत खंजीर खुपसला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेशीसुद्धा बेईमानी केली आहे. कारण जनतेचा कौल भाजप-शिवसेनेला होता. तो शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी नव्हता. आम्ही तेव्हाही आमच्या शब्दावरून फिरलो नाही, अन् आताही नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
भाजप नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना टारगेट करत असल्याचा आरोप केला जातो, याबाबत छेडले असता दानवे म्हणाले की, आम्ही कुणाच्याही वाट्याला जात नाही. कायदा त्याचे काम करत असतो, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करीत नाही. त्यांची कृत्य जशी आहेत, तशीच फळ त्यांना मिळत आहेत. त्यासाठी आम्हाला दोषी धरणे कदापिही योग्य नाही. आम्हाला बोलण्याच्या आधी त्यांनी आपले आचरण सुधारावे. आम्ही जाणीवपूर्वक काहीही करीत नाही. आम्ही आमच्या शब्दावर तेव्हाही ठाम होतो आणि आजही आहोत, असे ते म्हणाले.
दरम्यान, रेल्वेमध्ये यापुढे डबाबंद अन्न दिले जाणार नाही, तर तेथे शिजविलेले अन्न प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन झालेले आहे. देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे सरकारचे नियोजन आहे. शेतकर्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारने विदर्भालाही भरभरून दिलेले आहे. वर्धा नांदेड रेल्वे मार्गासाठी 3000 कोटी, वर्धा बल्लारशासाठी 1800 कोटी, वर्धा नागपूरसाठी 600 कोटी आणि नागपूर नागभीडसाठी 114 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.