पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण सत्राचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे रविवारी (दि. 13) करण्यात आले आहे. ज्या मुलांनी आपले लसीकरण करून घेतले नाही त्यांनी आपल्या पहिल्या व दुसर्या डोसचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असून या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने उपजिल्हा रुग्णालय पनवेल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 5 खारघर येथे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कोवॅक्सीन लसीच्या पहिल्या व दुसर्या डोसचे विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
याशिवाय महापालिकेच्या अधिकृत लसीकरण केंद्रावरती कोविशिल्ड व कोवॅक्सीनचा दूसरा डोस व बूस्टर डोस सोमवार ते शनिवार उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी, सहव्याधीग्रस्त् (कोमॉर्बिड) नागरिकांनी (प्रीकॉशनरी) बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी वेळापत्रकानुसार सोमवार ते शनिवार लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शाळाबाह्य मुलांनीदेखील अधिकृत लसीकरण केंद्रावरती जाऊन लसीकरण करून घ्यावे. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यांला व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहेत. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी आणि ऑनलाइन नोंदणी करावी. रोज होणारे लसीकरणाचे सेशन ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने समाजमाध्यमावर प्रसिद्ध होणार्या प्रेस नोट मध्येही रोजच्या लसीकरणाची माहिती देण्यात आहे.