दुचाकीवरून आलेल्या दुकलीने झाडल्या गोळ्या; तरुण गंभीर
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव शहरातील कचेरी रोड मार्गावर शनिवारी (दि. 12) रात्री 12.10च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी मेडिकलचे दुकान बंद करून पायी चालत जाणार्या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर पळून गेले. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील फिर्यादी दीपक रामकिशोर यादव व जखमी तरुण शुभम ग्यानचंद जैस्वाल (वय 24, रा. माणगाव) हे आपले मेडिकल दुकान बंद करून घरी पायी चालत जात होते. त्या वेळी कचेरी रोड येथून एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल त्यांच्यासमोर आली आणि चालकाने इंदापूरला जाणारा रस्ता कोठे आहे असे त्यांना विचारले. तेव्हा शुभम त्यांना रस्ता सांगत असताना दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या दुसर्याने त्याच्याजवळील पिस्तुलने शुभमवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने इंदापूर बाजूकडे पळून गेले.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अलिबाग येथून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले, मात्र या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नसून माणगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.