
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
दिवाळीनिमित्त सिडको महामंडळाने विविध योजनांतर्गत, नवी मुंबईच्या विविध नोडमधील सामाजिक उद्देशाचे तसेच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक भूखंड आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची भव्य योजना आणली आहे.
या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या खारघर, पनवेल, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील व सिडकोच्या गृहनिर्माण संकुलांतील वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात सिडकोच्या सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यार्थी वसतिगृहासोबतच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक वापराकरिता लहान व मध्य आकाराचे भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेद्वारे सिडकोने लहान व मध्यम आकारांचे भूखंड उपलब्ध करून दिले असून या भूखंडांची मालकी निर्वेध (क्लिअर टायटल) आहे. प्रचलित दरांपेक्षा या भूखंडांचे दर तुलनेने कमी असून नवी मुंबईतील सुविकसित नोडमध्ये हे भूखंड स्थित आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची, तर छोट्या व मध्यम विकसकांना आपल्या स्वप्नातील प्रकल्प विकसित करण्याची संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनेतील वाणिज्यिक गाळे हे नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी आणि सुप्रस्थापित बाजारात असल्याने व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धिची व गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची संधी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबईच्या सुविकसित परिसरात पुनर्विक्रीद्वारे (रिसेल) वाणिज्यिक गाळे मिळणे दुरापास्त असल्याने व्यावसायिकांना व सर्वसामान्य नागरिकांना या योजनेद्वारे वाणिज्यिक गाळे मिळण्याची सुसंधी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक उद्देशांकरिता भूखंड उपलब्ध करून देत सिडकोने नेहमीप्रमाणे भौतिक आणि सामाजिक विकासातील समतोलही साधला आहे.
योजना ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीने पार पडणार आहेत. या योजनांकरिता निविदाकारांची नोंदणी, अर्ज सादर करणे, अनामत रकमेचा भरणा करणे, बंद निविदा सादर करणे, ई-लिलाव प्रक्रिया व योजना पुस्तिका इ. सर्व तपशील सिडकोच्या https://eauction.cidcoindia.com या ई-लिलाव संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दिवाळीत कोरोनारूपी अंध:कार दूर करून विकासाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी सिडकोने भूखंड व वाणिज्यिक गाळे विक्रीची ही भव्य योजना आणली आहे. छोट्या आणि मध्यम बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांकरिता सिडकोची ही दिवाळी भेट मोलाची ठरणार आहे.
–डॉ. संजय मुखर्जी, एमडी, सिडको