एलईडी लाईट, पर्सनेट जाळी नौकांमुळे समुद्रात मच्छीचा दुष्काळ
रेवदंडा : प्रतिनिधी
एलईडी लाईट व पर्सनेट जाळी असलेल्या नौका फार मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी करीत असल्याने समुद्रात मच्छीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्रात जाऊनही जाळ्यांत म्हावरं येत नसल्याने स्थानिक मच्छीमार बांधव हतबल झाले आहेत. थेरोंडा, आग्राव, रेवदंडा, कोर्लई, बोर्ली परिसरातील कोळी बांधवाच्या नौका समुद्र किनारी व खाडी परिसरात उभ्या आहेत तसेच मच्छी सुकविण्याचे खळेही रिकामे आहेत. कोळी बांधव व भगिनींच्या हाती कामच उरले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
एलईडी लाईट व पर्सनेट जाळ्यांचा वापर करून मच्छीमारी करणार्या नौका खोल समुद्रात मासेमारी करीत आहेत, त्या मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी करीत असल्याने, लहान नौकांच्या जाळ्यात मच्छी सापडत नाही व त्यांना हात हलवित परत यावे लागते. या मच्छीमारी नौकांचा डिझेल खर्च, कामगार खर्च अंगावर पडतो. समुद्रात मच्छी सापडत नसल्याने छोट्या नौका समुद्रकिनारी व खाडीत उभ्या ठेवल्या आहेत. म्हावरंच जाळयांत गावत नसल्याने मच्छीमार बांधवांना रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे, कामगारांच्या पगारपाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक मच्छीमार संस्थेत डिझेल विक्री होत नसल्याने संस्था बंद ठेवाव्या लागत आहेत. तसेच नेहमीच गजबजलेले मच्छी वाळविण्याचे खळे रिकामे असल्याचे चित्र रेवदंडा, थेरोंडा, आग्राव, कोर्लई, साळाव येथील कोळीवाड्यात दिसून येते.