आंब्याच्या कैर्याही खवय्यांच्या पसंतीला
रोहे ः प्रतिनिधी
येथील बाजारपेठेत काजू बिया आणि आंब्यांच्या कैर्यांची आवक वाढली असून, त्यामुळे आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे.
काजू बियांची भाजी आणि आंब्यांच्या कैर्याच्या कापून तयार केलेल्या फोडी हे कोकणातील खवय्यांचे आवडते खाद्य पदार्थ आहेत. मार्च, एप्रिलमध्ये खवय्ये या दोन्ही फाळांचा बाजारात शोध घेताना दिसतात. या वर्षी आदिवासी बांधवांनी मोठया प्रमाणात व वाजवी दरात काजूबिया उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या खरेदी करण्यासाठी रोह्याच्या बाजारपेठेत सायंकाळी ग्राहाकांची गर्दी दिसून येत आहे. कैर्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी महिला कच्च्या काजुच्या बिया (गोळे) विक्रीस आणत असल्यान रोहे शहरात त्यांची आवक वाढली आहे. यामुळे दोन महिने का होईना आदिवासी बांधवांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
रोहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे. तेथे आदिवासी वाड्या आहेत. हे आदिवासी बांधव उन्हाळयात प्रामुख्याने जांभळे, करवंदे तर पावसाळयात रानभाज्या विक्रीस आणतात. आता कच्च्या काजुच्या बिया (गोळे) ही ते विक्रीस आणत आहेत. या काजुचे वाटे 100च्या आसपास बाजारात मिळतात. ग्राहक भाजीसाठी काजू बियांची खरेदी करतात. सध्या रोहे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात काजूचे गोळे विक्रीसाठी उपलब्ध होत असून, ग्राहकही त्याची आवडीने खरेदी करीत असल्याने आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे. काजू बियांची विक्री करुन काही आदिवासी बांधव दिवसाकाठी 500 ते 1000 रूपयांचे उत्पन्न मिळवित आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात करंवदेही बाजारात विक्रीस आली आहेत.
आंब्याच्या कैर्याची आवकही बाजारात वाढली आहे. भाजीसह चटणी, लोणचे व अन्य पदार्थ करताना कैर्यांचा वापर होत असल्याने गृहिणी बाजारातून मोठ्या प्रमाणात कैरीची खरेदी करताना दिसत आहेत. पाच रूपयापासून ते 10 रूपयापर्यंत कैर्यांचा वाटा दिला जातो. आदिवासी बांधव कैर्या विक्रीस आणत आहेत.