Breaking News

चोंढी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

अलिबाग ः प्रतिनिधी

किहीम येथील दानशूर व्यक्ती कै. दत्ताराम गणपतराव शेटे यांनी आपल्या चोंढी येथील जागेत 1951 साली सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले होते. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले होते. या प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी शेटे कुटूंबाने जिल्हा परिषदेकडे केलेली आहे.

ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी अलिबाग तालुक्यातील किहीम गावचे दानशूर व्यक्तिमत्व आणि संत गाडगेबाबा महाराज यांचे शिष्य कै. दत्ताराम गणपतराव शेटे यांनी चोंढी येथे 1951 साली स्वतःच्या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. त्याला आपल्या पत्नीचे कै. आनंदीबाई दत्ताराम शेटे धर्मार्थ दवाखाना नाव दिले. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन गाडगेबाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी जिल्हा रुग्णालयाचीही स्थापना झाली नव्हती. त्याआधीपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा दिली जात होती. बैठ्या इमारतीत दोन खोल्यांसह त्या वेळच्या संपूर्ण आधुनिक उपकरणांसहित सुसज्ज असे दवाखाना व सुतिकागृह (मॅटर्निटी) उभारले होते. आजही पंचक्रोशीतील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा दिली जात आहे. या आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडून कोरोना काळात लसीकरण, तपासण्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यकाळातही अलिबाग ते रेवस विभागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मोफत दिली जात होती. अनेक महिलांच्या प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या आहेत.

गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 71 वर्षापूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. ऐतिहासिक ठेवा असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने बांधण्यात यावे अशी मनोकामना शेटे कुटूंबाने व्यक्त केली आहे.  या आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधावी अशी मागणी याबाबत दत्ताराम शेटे याचे नातू डॉ. आशिष शेटे यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.

चोंढी येथे 1951 साली आजोबांनी रुग्णालय बांधून ते दान केले होते. त्यामुळे अलिबागपासून रेवसपर्यंत नागरिकांना आरोग्य सेवा मिळत होती. सध्या या इमारतीची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेने ही इमारत बांधून त्याला आजोबांचे नाव द्यावे. अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही एक लाख रुपये मदतही करू.

-डॉ. आशिष शेटे

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply