रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनबाधितांना भाजपचा पाठिंबा
कर्जत : बातमीदार
रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनसाठी दिलेल्या जागेचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना कंपनी आणि प्रशासनाविरुद्ध कर्जत तहसील कार्यालयाबाहेर बुधवारी (दि. 19)पासून उपोषण सुरू केले आहे. शेतकर्यांच्या या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे.
रिलायन्स कंपनीच्या दहेज ते नागोठणेदरम्यानच्या इथेन गॅस वाहून नेणार्या पाईपलाइन प्रकल्पात कर्जत तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत. दिलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून रिलायन्स कंपनी आणि सक्षम अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत, मात्र जी रक्कम शेतकर्यांना सांगण्यात आली त्यानुसार ती दिली गेलेली नाही. काही शेतकर्यांना तर जमिनी अधिग्रहण करूनही आजतागायत कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यांसाठी सर्व शेतकरी कर्जत येथील तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
भाजप किसान मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, भाजप कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, जनार्दन तरे, प्रल्हाद राणे, सुरेश खाडे, रमेश कालेकर, रोहित राणे, नरेश कालेकर, उमेश राणे, मंगेश तरे, बाळा शेकटे, अमर मोगरे, तुकाराम तरे, दिनकर सोनावळे, सुनील शेकटे, वंदना शेकटे, गणपत बाबरे, तुकाराम काळण, वाळकू सोनावळे, पंढरीनाथ सोनावळे, वसंत शेळके, तानाजी हजारे आदी उपोषणाला बसले आहेत. न्याय्य हक्कासाठी गुन्हे अंगावर घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण आता मागे हटायचे नाही असा निर्धार सर्व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी केला आहे.
उपोषणस्थळी भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपाध्यक्ष वसंत भोईर, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक राहुल वैद्य, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, जिल्हा पदाधिकारी मंदार मेहेंदळे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक पवार, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आदी उपस्थित होते.