Breaking News

ज्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणात सण रोखले, त्यांना जनता उत्तर देईल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

लखनऊ ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 20) उत्तर प्रदेशातील हरदोई येथे जाहीर सभेला संबोधित केले. ज्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणात सण रोखले, त्यांना येथील जनता 10 मार्चला उत्तर देईल, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. अनेक दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा झाली आहे. आज मी याचा उल्लेख करीत आहे, कारण काही राजकीय पक्षांनी अशा दहशतवाद्यांवर मेहरबानी केली आहे. ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तुमचा हा उत्साह आपल्या सर्वांसाठी मोठा आशीर्वाद आहे. होळीसारख्या पवित्र सणाचा हरदोईच्या पवित्र भूमीशी असलेला संबंध आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मला माहीत आहे, या वेळी हरदोई आणि उत्तर प्रदेशच्या लोकांनी दोनदा रंगांची होळी खेळण्याची तयारी केली आहे. भाजपच्या बंपर विजयाची पहिली होळी 10 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे, पण 10 मार्चला होळी साजरी करायची असेल, तर त्याची तयारी आतापासूनच मतदान केंद्रावर, घरोघरी जाऊन करावी लागणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. अहमदाबादमध्ये दोन वेळा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पहिल्या स्फोटानंतर दुसर्‍या स्फोटात त्यांनी सायकलला बॉम्ब बांधून हॉस्पिटलमध्ये स्फोट घडवण्याची योजना आखली होती. संकटमोचन मंदिरावरही त्यांनी हल्ला केला आणि त्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे सरकार होते. सपाने नेहमीच स्वतःच्या फायद्यासाठी अशी पावले उचलली आहेत. 2006मध्ये काशीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. संकटमोचन मंदिरातही स्फोट झाला. तेथील कँट रेल्वेस्थानकावरही हल्ला करण्यात आला. 2013मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा या लोकांनी शमीम अहमद नावाच्या आरोपीवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. अहमदाबाद प्रकरणातही त्यांना दिलासा द्यायचा होता, पण तब्बल 20 वर्षांनी यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे. समाजवादीने दहशतवाद्यांना दया दाखवण्याचे आदेश दिले आहेत. आता देशातील जनता त्यांना सहन करणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 2007मध्ये लखनऊ, अयोध्या येथील न्यायालय परिसरात बॉम्बस्फोट झाले होते. 2013मध्ये समाजवादी सरकारने तारिक काझमी नावाच्या दहशतवाद्यावरील खटला मागे घेतला, मात्र या प्रकरणातही न्यायालयाने समाजवादी सरकारचे कारस्थान चालू दिले नाही आणि त्या दहशतवाद्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये एक-दोन नव्हे; तर 14 दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये समाजवादी सरकारने अनेक दहशतवाद्यांवरील खटले मागे घेण्याचे आदेश दिले होते. हे लोक स्फोट घडवत होते आणि समाजवादी पक्षाचे सरकार या दहशतवाद्यांवर कारवाईही होऊ देत नव्हते. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांची वृत्ती आणखी घातक ठरली आहे. हे लोक ओसामासारख्या दहशतवाद्याला आदराने ओसामाजी असे म्हणतात. बाटला हाऊस चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यावर या लोकांनी अश्रू ढाळले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट झाले होते. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्याच दिवशी माझे सरकार या दहशतवाद्यांना शोधून त्यांना शिक्षा करेल, असा संकल्प मी केला होता. काही दिवसांपूर्वी या बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा झाल्याचे तुम्ही पाहिले आहे. अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याने इतकी वर्षे मी गप्प बसलो होतो. आज न्यायालयाने दहशतवाद्यांना शिक्षा सुनावल्यानंतर मी आता देशासमोर हे प्रकरण मांडत आहे आणि दहशतवाद्यांचे अनेक मॉड्यूल संपवण्यासाठी मी गुजरात पोलिसांचे केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी नमूद केले.

कधी मुंबईत, तर कधी दिल्ली, जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, गुवाहाटी, लुधियाना, आगरतळा, इम्फाळ येथे बॉम्बस्फोट झाले. त्या काळात किती शहरे बॉम्बस्फोटांनी हादरली. त्या हल्ल्यांमध्ये कितीतरी निष्पाप नागरिकांचा बळी गेला, पण ज्यांना आम्हा भारतीयांचा नाश करायचा होता, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply