Breaking News

महापुरानंतर महाडमधील पहिला मजला रिकामा

22 जुलै रोजी आलेल्या महापुरामध्ये महाड शहर आणि तालुक्यातील अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले होते. शहरातील पुराच्या पाण्याची पातळी कधी नव्हे ती जवळपास 20 फुटापर्यंत पोहोचली. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान महाडकर नागरिकांना सहन करावे लागले होते. या महापुरानंतर महाड शहर पुन्हा उभे राहते की, नाही प्रश्न होता. मात्र मोठ्या धिटाईने महाडकर पुन्हा उभे राहिले. अन्य भागातून नोकरीनिमित्त आलेल्या लोक मात्र महाड सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. बहुतांश लोकांनी गाळे आणि पहिल्या मजल्यावरील सदनिका विक्रीस काढल्याचे ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरून दिसून येत आहे. 22 जुलैच्या महापुराने संपूर्ण महाड शहर आणि तालुक्याची कंबरच मोडली. शहरातील पाण्याची पातळी 20 फुटापर्यंत गेल्याने दुकानातील आणि घरातील सामान, साहित्य भिजून खराब झाले. या पुरात व्यापारी वर्गाचे अब्जो रुपयांचे नुकसान झाले. शहर पुन्हा कसे उभे राहील हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. उद्ध्वस्त झालेले महाड शहर पुन्हा उभे राहणे सर्वांसमोर एक मोठे आव्हान होते. महाराष्ट्रातून आलेली मदत आणि लोकांचे हात, महाड पुन्हा उभे करण्यास महत्वाचे ठरले. महाड आता बर्‍यापैकी पूर्वपदावर आले आहे. यामुळे लोकांच्या मनातून पुराची भीती निघून गेली आहे, असे वाटत असले तरी पुन्हा असाच सामना करावा लागेल की, काय या भीतीतून मात्र महाडकर सावरलेले नाहीत. भाडेकरु सोडून गेल्याने इमारतीच्या इमारती ओस पडल्या आहेत. येथील बाजार पेठेत पुन्हा नवीन नवीन उद्योग सुरू केले जात आहेत. त्यामध्ये खाद्य पदार्थाची दुकाने, हॉटेल, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात उघडण्यात येत आहेत. मात्र नोकरी, धंद्यानिमित्ताने आलेल्या अनेकांनी ‘गड्या आपला गाव बरा‘ असे म्हणत, महाडमध्ये घेतलेल्या सदनिका विकून टाकण्यावर भर दिला आहे. शहरातील बहुतांश भागात सध्या बांधकाम प्रकल्प सुरु आहेत. मात्र या इमारतीमधील सदनिकांना ग्राहक नसल्याने केवळ हातात घेतेलेले काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. महाडमध्ये जमीन घेताना फार विचार केला जात आहे. मात्र जागा विकत घेणारेदेखील याठिकाणी पाणी आले होते का, असा प्रश्न करूनच पुढील चर्चेला तयार होत आहेत. शहरात अशीच स्थिती पुढील काही वर्षात कायम राहिल्यास शहरातील आर्थिक गणिते ढासळण्यास वेळ लागणार नाही. सद्य स्थितीत पहिल्या मजल्यावरील सदनिका आणि पार्किंग जागेत बांधलेले गाळे अनेकांनी विक्रीस काढले आहेत. त्याचे फलक जागोजागी दिसून येत आहेत. हे गाळे परराज्यातून आलेले व्यवसायिक घेत असल्याचे चित्रदेखील पुढे येत आहे. बहुतांशी सदनिका या भाडे तत्वावर दिल्या आहेत. पुराच्या पाण्याच्या वेगाने सावित्री नदी किनारील इमारती धोकादायक ठरल्या आहेत. या इमारतींमध्ये राहण्यास मज्जाव केला जात आहे. तर काही इमारती या रि-डेव्हलप केल्या जाणार आहेत.

-महेश शिंदे

Check Also

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply