तळोजा : रामप्रहर वृत्त
असंरक्षित कामगारांसाठी शासनाने केलेल्या नियमांना हरताळ फासून तळोजामधील काही कंपन्या स्वत:चा मनमानी कारभार चालवित आहेत. कामगारांचे वेतन, त्यांचा भविष्य निर्वाह निधी, तसेच वैद्यकीय सुविधांबाबत हलगर्जीपणा करणार्या कंपन्यांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपन्यांना आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना तळोजा येथील इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कंपनी मालक, कामगार संघटना आणि शासकीय अधिकारी यांच्या सभेत केली.
शासकीय यंत्रणेचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी उपस्थित सर्व कंपनी व्यवस्थापन प्रतिनिधींना असंरक्षित कामगारांसाठीचे कायदे, त्यांची नोंदणी प्रक्रिया व त्यात कंपन्यांची भूमिका स्पष्ट करीत ते न केल्यास होणारे परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. या सभेमध्ये तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शेट्टी, जनरल सेक्रेटरी भट्टाचार्य आणि कार्यकारी सचिव सुनील पडियाली यांच्यासह शासकीय गोदी कामगार व मच्छीमार श्रमजीवी कामगार मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव, मंडळाच्या निरीक्षक म्हस्के मॅडम, भाजप माथाडी सुरक्षारक्षक ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय भगत, सरचिटणीस अनिल खोपडे, रायगड जिल्हा सचिव रमेश देवरूखकर उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार लवकरच असंरक्षित कामगारांच्या हितासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन सर्व कंपन्यांच्या वतीने तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिले.