कर्जत : बातमीदार
नेरळ जवळील ममदापूर गावातील वरच्या आळीमधील एका घरात रविवारी (दि. 20) सायंकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात संपूर्ण घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरात असलेल्या सीताबाई रामा डांगरे या आजी थोडक्यात बचावल्या. ममदापूर गावात सीताबाई रामा डांगरे यांचे घर आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सीताबाई जेवण बनवत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्या नंतर कौलारू घराला आग लागली. ग्रामस्थांनी सीताबाई यांचे पुत्र राजेंद्र यांच्या घराच्या आवारातील बोअरवेलचे पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या घरात लाकडांचे सिलिंग केले असल्याने आग भडकली. त्यात घराचे 90टक्के नुकसान झाले. काही तरुणांनी थेट घरावर चढून पाण्याचा मारा सुरू ठेवला होता. या प्रयत्नात राजेंद्र डांगरे जखमी झाले तर काही तरुण खाली जमिनीवर कोसळले. त्यांना किरकोळ मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी कर्जत येथील अग्निशमन केंद्राला खबर दिली, मात्र ही अग्निशमन यंत्रणा ममदापूर गावात रात्र साडे आठ वाजता पोचली. तासाभराने आग विझविण्यात यश आले. दरम्यान, नेरळ येथील भारत गॅसचे पथक घटनास्थळी पोहचले.