सिडकोला नेचर पार्क प्रकल्पाचा विसर; भविष्यात टेकडीच्या सपाटीकरणाचा वन विभागाचा अंदाज
पनवेल : वार्ताहर
खारघर डोंगरावर होणारी वृक्ष तोड, नागरिकांनी पाटर्यामुळे पसरणारी अस्वच्छता यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारघर टेकडीवर सिडकोने पाच वर्षांपूर्वी दहा कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करून नेचर पार्क उभारण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी 80 हजारांहून अधिक रोप लागवडदेखील सिडकोने खारघर टेकडीवर केली होती, मात्र आता हा नेचर पार्क प्रकल्प गुंडाळल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. सिडकोने दुर्लक्ष केल्यास भविष्यात खारघर टेकडीचे सपाटीकरण व्हायला वेळ लागणार नाही, असे वन विभाग अधिकार्यांनी सांगितले आहे.
नवी मुंबई आणि खारघर शहराचा विकास करताना खारघर टेकडीवर ठाणे आणि पनवेल वनविभागाचे जवळपास साडे चौदाशे हेक्टर क्षेत्र वन विभागाचे तसेच उर्वरित 670 हेक्टर क्षेत्र वनेतर क्षेत्र आहे. त्यामुळे वन विभाग क्षेत्रातील जागेत ‘सिडको’च्या सहकार्याने नैसर्गिक संपत्ती जोपासण्यासह वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संपूर्ण क्षेत्राला वुंपन, वॉच टॉवर, ग्रीन वॉक विकसित करुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नंतरचे रहिवाशी क्षेत्राजवळील म्हणून सर्वात मोठे नेचर पार्क विकसीत करण्याचा प्रकल्प सिडकोने 2006-07 हाती घेतला होता. गेल्या दहा वर्षात सिडकोने 80 हजाराहून अधिक रोप लागवड खारघर टेकडीवर करुन वृक्ष संवर्धन केले. त्यासाठी सिडकोने जवळपास 10 कोटीहून अधिक रुपये खर्च केले. रोप लागवडीमुळे खारघर टेकडीचे रुप पालटले होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून सिडकोने उद्यान विकसित करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत बंद केल्यामुळे नेचर पार्कचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचे ठाणे आणि पनवेल वन विभाग अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, नेचर पार्क प्रकल्प ज्या अधिकार्यांच्या काळात सुरु झाला, त्या अधिकार्यांची महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणी बदली झाली आहे. ‘सिडको’ला खारघर टेकडीवरील पर्यावरणाचे संवर्धन करावयाचे असेल तर त्या ठिकाणी पदपथ, बसण्यासाठी बाकडे आदी कामे करु नयेत. टेकडी ‘जैसे थे’ ठेवून डोंगरावरील वृक्ष तोड न होऊ देण्याची तसेच डोंगरावर पाटर्यांना बंदी घालण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सिडको’ने कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा काही कामगारांची नेमणूक करून खारघर डोंगरावरील पर्यावरण ठिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे ‘सिडको’च्या पर्यावरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्पष्ट केले.
‘सिडको’ने पनवेल आणि ठाणे वन विभागाच्या माध्यमातून नेचर पार्क विकसित करताना ठाणे वन विभागाच्या हद्दीत अधिक जमीन असल्यामुळे ठाणे वन विभागाने खारघर डोंगरावरील फणसवाडी पाड्यातील चार व्यक्तींची सुरक्षा रक्षक म्हणून ठोक मानधन तत्वावर नेमणूक केली होती. ‘सिडको’ने वन विभागाला आर्थिक मदत करणे बंद केल्यामुळे ठाणे वन विभागाने या 4 सुरक्षा रक्षकांचा जवळपास आठ महिन्याचा पगार दिला नाही, अशी माहिती फणसवाडी गावातील जोमा मधे यांनी दिली.
दरम्यान, ‘सिडको’कडून आर्थिक मदत मिळेल म्हणून काही महिने खिशातून सुरक्षा रक्षकांचा पगार दिला. ‘सिडको’ने मदत बंद केल्यामुळे कामगारांचे मानधन दिले नाही, असे वन विभाग अधिकार्यांनी सांगितले.
निसर्गरम्य ठिकाणाचे सिडकोचे स्वप्न
नेचर पार्क विकसित करताना, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील निसर्ग प्रेमींसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नंतरचे रहिवाशी क्षेत्राजवळील सर्वात मोठे निसर्ग उद्यान होणार आहे. तसेच नेचर पार्क निसर्गरम्य ठिकाण बनणार आहे, असे ‘सिडको’चे तत्कालीन महाव्यवस्थापक (पर्यावरण विभाग) जी. के. अनारशी यांनी सांगितले होते. आता जी पर्यावरणाची हानी सुरू आहे व प्रकल्पाचे काम बंद आहे याविषयी ‘सिडको’च्या जनसंर्पक अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.