Breaking News

पावसाळी पर्यटनासाठी पनवेलला पसंती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पावसाळा सुरू झाल्यापासून पनवेल परिसरामधील पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढली आहे. कर्नाळा किल्ला व अभयारण्याला रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक भेट देत आहेत. कलावंतीन दुर्ग व प्रबळगडावरील गर्दीही वाढत असून याच परिसरातील इरशाळगडालाही ट्रेकर्सची पसंती मिळत आहे. या परिसरातील धबधबेही मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश होत आहे. गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव व विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे राज्यातील व देशभरातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून रविवार व सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील पर्यटक पनवेलमधील पर्यटनस्थळांवर गर्दी करू लागले आहेत. सर्वाधिक गर्दी कर्नाळा किल्ला व अभयारण्यामध्ये होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असल्यामुळे व निसर्गाचे वरदान लाभल्यामुळे या ठिकाणाला पसंती मिळू लागली आहे. बहुतांश पर्यटक पनवेलवरून एसटी बसने कर्नाळाला जात आहेत. 12 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील अभयारण्यामध्ये तब्बल 642 प्रकारचे वृक्ष, 134 स्थानिक व 38 प्रकारचे स्थलांतरित पक्षी असल्यामुळे पक्षी निरीक्षकही मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. कर्नाळा किल्ला पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. समुद्रसपाटीपासून 445 मीटर उंचीवर असलेल्या किल्ल्यावरील अंगठ्याच्या आकाराचा सुळका व पुरातन वास्तूचे अवशेष पाहावयास मिळत असल्यामुळे दुर्गप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत. वनविभागानेही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळाचे किल्लेदार होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभल्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये या ठिकाणाची विशेष ओढ आहे.

कर्नाळानंतर सर्वाधिक गर्दी कलावंतीन व प्रबळगड किल्ल्यावर होत आहे. कलावंतीन दुर्गचा सुळका देश-विदेशातील ट्रेकर्सला आकर्षित करत आहे. कातळामध्ये कोरलेल्या पायर्‍या चढून गडावर जाणे आव्हानात्मक आहे. यामुळे एकदातरी कलावंतीनच्या अवघड पायजया चढून गडावर जायचे अशी इच्छा राज्यभरातील ट्रेकर्सची असते. यामुळे प्रत्येक रविवारी राज्याच्या कानाकोपर्‍यातून नागरिक या ठिकाणी येत असतात. कलावंतीन सुळक्याचे दृश्य कॅमेराबद्ध करण्यासाठी प्रबळगडावर जाणे आवश्यक असते. यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक एकाच दिवशी दोन्ही किल्ल्यांना भेटी देत असतात. याच परिसरामध्ये मोरबे धरणाजवळ इरशाळगड आहे. माथेरानच्या रांगेतील या कि ल्ल्याला भेट देणाजया पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. कर्नाळा, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड व इरशाळगडावर प्रत्येक आठवड्याला दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक भेट देऊ लागल्यामुळे या परिसरातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळू लागली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply