आमदार गणेश नाईक यांचा पालिकेला इशारा
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिकेने आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीकपातीचा घेतलेला निर्णय नवी मुंबईकरांसाठी अन्यायकारक असून तो मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाला दिला आहे.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना आमदार गणेश नाईक यांनी या संदर्भात मंगळवारी (दि. 22) सडेतोड पत्र लिहले असून पाणीकपातीचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. मोरबे धरणात पुरेसा पाणीसाठा असताना पाणीकपात कशाला? मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी मोरबे धरणात 20 सप्टेंबर 2022 पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असताना नागरिकांवर आताच पाणीकपात लादणे अन्यायकारक असल्याचे आमदार नाईक यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईत अगोदरच अनियमित आणि असुरळीत पाणीपुरवठयाचा त्रास आहे. त्यात आता एक दिवस सायंकाळी पाणीपुरवठा पालिका बंद ठेवणार असल्याने नागरिकांच्या हालात भरच पडणार आहे. तुर्भे, नेरूळ, ऐरोली, घणसोली, बेलापूर, कोपरखैरणे, वाशी इत्यादी भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसणार आहे. एमआयडीसीकडून नवी मुंबई पालिका क्षेत्रात देय पाणीपुरवठा पुर्णपणे होत नाही. दिघा, ऐरोली, घणसोली हे भाग एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असल्याने या भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे.
आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर आजवर झालेल्या बैठकांमधून नवी मुंबईकरांना पुरेसे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केलेली आहे. एमआयडीसीकडून नवी मुंबईला होणारा पाणीपुरवठा अन्यत्र वळविण्यात येतो आहे. त्यामुळे नवी मुंबईचा पाणीपुरवठा एमआयडीसीने कमी केला आहे. ही बाब आमदार नाईक यांनी पालिका प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिली आहे. महापालिका प्रशासनाच्या एमआयडीसीकडून नवी मुंबईच्या हक्काचे पाणी मिळवून घ्यावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. त्याचबरोबर पाणीकपातीचा निर्णय तातडीने मागे घेतला नाही तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून जनतेसमवेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गृहसंकुलातील विविध समस्या सोडविण्यासाठी सिडकोला पत्र
नवी मुंबई : बातमीदार
सिडको महामंडळाने घणसोली सेक्टर 10 मध्ये उभारलेल्या गृहयोजनेतील रहिवासी विविध समस्यांनी त्रस्त असून या समस्या सोडविण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार गणेश नाईक आणि ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे सोमवारी (दि. 21) लेखी पत्र देवून केली आहे. संदीप नाईक यांनी डॉ. मुखर्जी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या गृहसंकुलाच्या समस्या त्यांच्यासमोर मंगळवारी मांडल्या.
सिडकोने 14,838 घरांसाठी 2018 मध्ये कळंबोली, तळोजा, घणसोली या भागातील लॉटरी काढली. घणसोली सेक्टर 10 येथे 1272 घरांची निर्मिती केली आहे. लाभार्थ्यांपैकी बहुसंख्य लाभार्थी या गृहसंकुलात रहावयास आले आहेत. त्यांना घरांचा ताबा देवून सहा महिने होत आले आहेत, परंतु सुरूवातीपासूनच या गृहसंकुलातील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पाणीटंचाई, अस्वच्छ पाण्याचा पुरवठा, इमारतींना पाण्याची गळती, सोसायटीची स्थापना, सुरक्षिततेचा प्रश्न, चोरीच्या वाढत्या घटना, रस्ते, विद्युत दिवे, लिफ्ट, अपुरे सफाई कर्मचारी, अशा सर्व असुविधा दूर करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक डॉ. मुखर्जी यांच्याकडे केली आहे. डॉ. मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.