Breaking News

राष्ट्रीय युवा संसदेच्या राज्यस्तरीय निवड फेरीत ‘सीकेटी’चे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारत सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संसदीय आयुधे व त्यांच्या यथोचित उपयोजनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुने राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन केले जाते. त्याच्या रायगड जिल्हा प्राथमिक फेरी व राज्यस्तरीय निवड फेरीत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने संयुक्तरीत्या सहभागी होऊन नेत्रदीपक यश संपादित केले आहे. सीकेटी महाविद्यालयाच्या 19 फेब्रुवारी 2022 रोजी नेहा कुलकर्णी (तृतीय वर्ष विज्ञान-सूक्ष्मजीवशास्त्र विभाग), कृष्णाली जोशी (द्वितीय वर्ष विज्ञान शाखा), प्रिया चौधरी (प्रथमवर्ष विज्ञानशाखा) यांनी रायगड जिल्हास्तरीय फेरीत यशस्वी सहभाग घेत राज्यस्तरीय निवड फेरीसाठी पात्र ठरल्या. सोमवारी (दि. 21) ऑनलाइन माध्यमातून राज्यस्तरीय निवड फेरीत आपल्या अद्वितीय संसदीय तथा वक्तृत्व कौशल्याचा परिचय देत राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेसाठी कृष्णाली जोशी व प्रिया चौधरी यांनी निर्विवादपणे आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे महाराष्ट्र युवा संसदेच्या राज्यस्तरीय फेरीत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्वाच्या दोन्ही जागा सीकेटी महाविद्यालयाने पटकावल्या आहेत. प्रस्तुत स्पर्धेच्या यशस्वी सहभागासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून सहभागी स्पर्धकांना राष्ट्रीय युवा संसदेच्या नियमावली, अटी-शर्थी, वक्तृत्व, देहबोली, संबोधनातील चढ-उतार आदींचे इत्यंभूत मार्गदर्शन केले. प्रस्तुत प्रक्रियेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, डॉ. योजना मुनिव, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार, प्रा. अपूर्वा ढगे, प्रा. आकाश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी सहभागी स्पर्धक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply