कर्जत ़: बातमीदार
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आणि विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंड यांच्या संयुक्त प्रयत्नाने रविवारी तालुक्यातील 16 आदिवासी पाड्यांवर हुतात्मा नाग्यादादा कातकरी साखळी पुस्तक योजना सुरू करण्यात आली असून पुस्तकांच्या एका संचाचे वाचन झाल्यानंतर दुसरा संच आयोजक देणार आहेत. वाडी-वस्तीत राहणार्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा शुभारंभ मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून रविवारी कर्जत तालुक्यातील पळसदरी, भिसेगाव, बामणोली आणि नांगुर्ले येथील वनवासी वाड्यांमध्ये करण्यात आला. या वेळी 25 छोट्या पुस्तकांचा संच प्रत्येक वाडीवर एका स्वयंसेवकाकडे ठेवण्यात आला. या संचातील पुस्तके वाचून पूर्ण झाल्यानंतर हा संच बदलून दुसरा संच दिला जाणार आहे. ही साखळी पुस्तक योजना सुरवातीला कर्जत तालुक्यातील 16 वाड्यांवर सुरू करण्यात येत आहे. लक्ष्मीकांत वाचनालयाचे कार्याध्यक्ष पद्माकर गांगल, सचिव सूचिता जोगळेकर, ग्रंथपाल रामदास गायकवाड, गावच्या पोलीस पाटील विनया खोपकर, जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, प्रखंड मंत्री विशाल जोशी, सचिन ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र निगुडकर, वसंत महाडिक, गाजनन पवार, अंकुश दरेकर, घाडगे यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.