Breaking News

मराठी भाषेचा आदर करा -सचिन मयेकर

कर्जत : प्रतिनिधी

सध्याच्या काळात इंग्रजीची गरज आहे, मात्र आपल्या मायबोलीला दुर्लक्षित करून चालणार नाही. आपल्या मराठी भाषेचा आपण कायम आदर ठेवला पाहिजे. आपली मुले इंग्रजी शाळेत शिकत असली तरी घरी शक्यतो मराठी भाषेचा वापर करा, असे आवाहन राज्य परिवहन महांडळाचे रायगड विभागीय भांडार अधिकारी सचिन मयेकर यांनी कर्जत येथे रविवारी (दि. 27) व्यक्त केले. परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्जत आगाराच्या वतीने रविवारी मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. वाहतूक नियंत्रक वसंत बागुल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीपक देशमुख यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक असले तरीही आपल्या मराठी भाषेला विसरता कामा नये. आपण सर्व ठिकाणी मराठी भाषेतच बोलले पाहिजे, असे मत  विजय मांडे यांनी या वेळी व्यक्त केले. वाहतूक निरीक्षक हरेश पालकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक देवानंद मोरे, महादेव पालवे यांच्यासह आगारातील कर्मचारी व प्रवासी या वेळी उपस्थित होते.

रोह्यात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन

रोहे :  मराठी राजभाषा दिनानिमित्त रोहा एसटी स्थानकात रविवारी पत्रकार महादेव सरसंबे यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मचार्‍यांनी बसस्थानकात सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. या वेळी उत्साही वातावरणात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. आगर प्रमुख प्रियंका कांबळे, वाहतूक नियंत्रक पंढरीनाथ गडेकर, नेमू गावीत, संतोष गायकवाड, शंकर खानापुरकर, लेखनिक माधव पाटील, सागर गाणे, वैभव नाईक, वाहन परीक्षक गणेश महाडीक, पत्रकार विश्वजीत लुमन, निलेश ठमके यांच्यासह एसटी कर्मचारी व प्रवासी यावेळी उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply