पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात नुकतेच जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वाड्मय मंडळातर्फे ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांनी, मराठी न्यायशब्दकोश समृद्ध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात मराठी भाषा- न्यायव्यवस्थेतील उपयोगिता आणि आव्हाने या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. जोपर्यंत मराठी न्यायशब्दकोश समृद्ध होत नाही, तोपर्यंत अभ्यासक्रमात आणि न्यायालयात इंग्रजी शब्दांचा वापर होतच राहणार, असेही त्यांनी नमूद केले. चांगली वकिली करण्याकरिता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय नियमितपणे वाचणे अत्यंत गरजेचे असल्याचेही सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. संघप्रिया शेरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सहा. प्रा. भाग्यश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमात समृद्धी तिवाटणे आणि फैझान शेख या विद्यार्थ्यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या. या कार्यक्रमाची सुरुवात ‘लाभले आम्हास भाग्य’ या मराठी अभिमान गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.