Breaking News

वेताळवाडी किल्ल्यावरील तोफगाडा सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत लोकार्पण

कर्जत : प्रतिनिधी

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणार्‍या संघटनेमार्फत दि. 28 एप्रिल रोजी सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसून यात तोफेस या गाड्यावर अत्यंत वैभवात विराजमान करून त्याचे चाळीसगाव येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण व भारत विकास परिषदेचे क्षेत्रिय सचिव श्रीपाद टाकळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी अत्यंत उत्साहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व हळदा, गलवाडे, येथील ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवला प्रथम हळदा गावातून श्रीराम मंदिर येथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून संपूर्ण गावातून शिवपालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या समारोपानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार व परिसरातील ग्रामस्थ आणि मान्यवरांनी किल्ल्यावर जाऊन या तोफगाड्याची विधिवत पूजा करून भंडारा उधळीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो, गड किल्ले वाचवा महाराष्ट्र वाचवा, अशा घोषणांच्या गजरात या तोफगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

हा तोफगाडा चाळीसगाव येथील सह्याद्रीचे शिलेदार अजय जोशी यांनी बनविला असून यासाठी आलेला खर्च संस्थेचे संपर्क प्रमुख प्रकाश नायर यांनी स्वतः उपलब्ध करून दिला आहे. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मंगेश चव्हाण यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक करत अत्यंत निःस्वार्थपणे सह्याद्री प्रतिष्ठानचे शिलेदार महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी योगदान देत असून पुढील पिढीसाठी हा इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी समाजातील इतर घटकांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन करून मी सदैव सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कामासाठी तन-मन-धनाने मदत करेल, असे त्यांनी या वेळी सांगितले व पुढील चार तोफगाड्यांसाठी दोन लाख रुपयांचा स्वराज्य निधी सह्याद्री प्रतिष्ठानसाठी जाहीर केला. या वेळी श्रीपाद टाकळकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनीही उपस्थितांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभरातील विविध विभागांचे प्रमुख शिलेदार व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी हळदा व गलवाडे  येथील ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग व सहकार्य  लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले, तर आभार डॉक्टर पवन गिरी यांनी मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply