उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या अन्य तीन राज्यांमधील सत्ता राखत भारतीय जनता पक्षाने आपल्या शिरपेचामध्ये मानाचे अनेक तुरे रोवले आहेत. हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि देशाच्या राजकारणाला वळण देणारा ठरणार आहे. या भरघोस यशानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या संघर्षाला अधिकच धार येईल, यात शंका नाही.
उत्तर प्रदेशामध्ये ‘जो रामजी को लाये है, उन्ही को हम लायेंगे’ या गाण्याचा गजर दीड-दोन महिने सुरू होता. तेथील जनतेने या गीताचे शब्द अक्षरश: खरे करून दाखवले. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसर्यांदा दोन तृतीयांश बहुमत मिळवून भाजपने सत्तेचा गड राखला आहे. गेल्या 37 वर्षांमध्ये उत्तर प्रदेशच्या इतिहासात असे घडले नव्हते. प्रस्थापितांविरोधी लाट, महागाईचा आगडोंब आणि शेतकरी आंदोलनातून उभा राहिलेला असंतोष अशी अनेक आव्हाने भाजपसमोर होती. निदान माध्यम-पंडितांचे तसे मत होते. उत्तर प्रदेशात कोणतेही सरकार पुन्हा निवडून सत्तेवर येत नाही हा तेथील साडेतीन दशकांचा रिवाजही मोडला गेला आहे. हा करिश्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकर्तृत्वाचा. सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजना या दोन आघाड्यांवर योगी आदित्यनाथ यांचे सरकार गेली पाच वर्षे कार्यरत होते. धु्रवीकरणाच्या राजकारणाचा आरोप भाजपवर नेहमीच केला जातो. पण त्यात तथ्य नाही हे देखील या निवडणुकीतून स्पष्ट झाले. वास्तविक अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मंदिराच्या मुद्द्यावर मते मागणे भाजपला कठीण नव्हते. परंतु मोदी आणि त्यांच्या पक्ष सहकार्यांनी राममंदिराच्या मुद्द्याचे प्रचार मोहिमेत भांडवल केले नाही. ज्या मंदिराचा शिलान्यास मोदी यांच्या हस्ते झाला, त्या मंदिराचे निर्माण हा खरे तर भाजपच्या हक्काचा भाग होता. परंतु, मोदी-योगी या डबल इंजिनच्या सरकारने विकासकामांवर अधिकाधिक भर दिला. कल्याणकारी योजनांवर सढळ हाताने खर्च केला. कायदा-सुव्यवस्था कर्तव्यकठोरपणे राखली. बेकायदा बांधकाम करणार्यांची पळता भुई थोडी केली. म्हणूनच योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशची जनता कौतुकाने ‘बुलडोझर बाबा’ असे म्हणू लागली. भाजपने आपल्याकडील चारही राज्यात सत्ता राखली असतानाच पंजाब हे आपल्या हातातील एकमेव राज्य काँग्रेसने गमावले. पंजाब काँग्रेसमधील दुफळी आणि केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाची अकार्यक्षमता यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अंतर्गत बेदिलीचा इतका फटका बसूनही काँग्रेस पक्ष सुधारेल असे वाटत नाही. कारण तशी सुधारणा करण्याची त्यांचीच इच्छा दिसत नाही. गोव्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाला कडवी टक्कर मिळेल, असे म्हटले जात होते. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या शिरकावामुळे गोव्यामध्ये काही काळ चुरशीचे वातावरण निर्माण झालेले दिसले खरे. परंतु अंतिमत: गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळवून भाजपनेच गड राखला. या निकालांचा आणखी एक स्पष्ट अर्थ म्हणजे पंतप्रधान मोदी यांची जनमानसावर असलेली मोहिनी अजूनही कायम आहे आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कुशल निवडणूक व्यवस्थापन आजही भाजपला यशस्वी करत चालले आहे. ‘उत्तर प्रदेश तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, अशी घोषणा भाजपचे नेते आता देत आहेत, त्यात खूप अर्थ भरला आहे.