कर्जत : प्रतिनिधी
तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बिड बुद्रुक गावातील उदयोन्मुख चित्रकार रामदास शंकर लोभी यांचे ’जॉय ऑफ बिईंग’ हे चित्रप्रदर्शन दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सभागृहात 19 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय कला, संस्कृति आणि उत्सव यांचे महत्त्व पटवून देणारी रामदास लोभी यांची चित्रे मनाला मोहून टाकणारी आहेत. त्यांचे प्राथमिक कला शिक्षण खोपोली कला महाविद्यालयात तर उच्चकला शिक्षण पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात झाले आहे. त्यांची अनेक चित्र प्रदर्शने भारतात झाली असून वैयक्तिक महत्वाची प्रदर्शने मुंबई, पुणे, बंगलोर येथे झाली आहेत. 2017 मध्ये लोभी यांच्या चित्रांचे प्रदर्शन सिंगापूर येथे भरविण्यात आले होते. त्यानंतर ते बाली (इंडोनेशीया) येथील कला संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गेले होते.