Breaking News

पोलादपूर तालुक्यातील बहुचर्चित कापडे ते कामथे रस्ता

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील कापडे ते कामथे रस्त्याचे काम आठ वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याची दूरवस्था झाली होती. हा रस्ता जागोजागी उखडला असून, या रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ते रमेश धोंडू मालुसरे यांनी केली होती. डागडुजीच्या जबाबदारीचे शेवटचे वर्ष असताना ठेकेदाराने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. मात्र तेदेखील निकृष्ट झाल्यामुळे या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य झाले. या खड्डयांची जबाबदारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेवर येऊन पडली होती.

दरम्यान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेकडून कापडे ते कामथे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. मात्र या रस्त्यावरील पुलांच्या पुनर्बांधणी करण्याच्या कामाच्या निविदा महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्याबाहेरील दैनिकांमध्ये प्रसिध्द केल्याने हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कधी वर्ग झाला, याबाबत कोणालाही कानोकान खबर लागली नाही. निविदांमध्ये कामांची मुदत सहा महिने असल्याने भर पावसाळ्यात दुथडी भरलेल्या नद्यांवरील पुलांची पुनर्बांधणी करण्याचे आव्हान आहे. मात्र या मुदतीमध्ये ‘पावसाळ्यानंतर‘ अशी सवलतीची योजना अंमलात आणून ठेकेदारांना सवलत आणि परिसरातील ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

कापडे ते कामथे रस्ता जागोजागी उखडल्याबाबतचे रमेश मालुसरे यांचे आरोप प्रसिध्दीस दिल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता रिताली बारमदे यांनी वेळोवेळी ठेकेदार आर. के. चंदानी कन्स्ट्रक्शन्स कंपनी (उल्हासनगर) यांना नोटीसा बजावल्या. मात्र ठेकेदार कंपनीने या नोटीसांना भीक घातली नव्हती. शेवटी ठेकेदाराच्या अनामत रक्कमेतून निविदा काढून अन्य ठेकेदारांकडून हे काम पूर्ण करण्याचे इशारा दिला. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम सुरू असताना पाहणीसाठी आलेल्या कार्यकारी अभियंता रिताली बारमदे यांच्याकडे साखर खडकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मालुसरे यांनी नाराजी व्यक्त करून साईडपट्ट्या दोन्ही बाजूने भरण्याच्या तसेच त्याबाजूने खचलेल्या रस्त्याची दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या. मात्र ठेकेदाराने सर्व यंत्रसामुग्री जागेवरून हलवून काम थांबविले. याबाबत ठेकेदाराने उपअभियंता सी. एम. आंबीटकर यांना ग्रामस्थांचा विरोध असल्याचे तोंडी कारण सांगितले होते. या कारणाबाबत कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी याच विभागाचे ज्युनियर इंजिनियर सोनावणे यांनी बोरज ग्रामपंचायतीचे पत्र मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांचा खड्डे बुजविण्यास विरोध नसून निकृष्ट दर्जाच्या कामास विरोध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही खड्डे बुजविण्याचे काम कसेबसे रेटून पूर्ण करण्यात आले. आणि ठेकेदाराच्या डागडुगीच्या जबाबदारीची मुदत संपली. मात्र दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावर खड्डे पडत असल्यामुळे ठेकेदाराने केलेले काम निकृष्टच होते, याची पोचपावती मिळत आहे.

कापडे – कामथे रस्त्याच्या कामासंदर्भात राजकीय श्रेय लाटण्याचा कार्यक्रम लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या जाहीर प्रचारसभांतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून झाल्याचे तालुक्यातील जनतेला सातत्याने पाहावयास मिळाले. मात्र, प्रत्यक्षात या कामाचे भ्रष्टाचारामुळे वाटोळे झाले असताना झालेल्या भ्रष्टाचाराचे श्रेय घेण्याचे धाडस कोणीही दाखवित नव्हते. यासंदर्भात अनेक वृत्तपत्रांमधून लक्ष वेधले असता काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांनी खुलासे करून सारवासारवीचाही प्रयत्न करून झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याऐवजी दडपण्याचा प्रकार केला. तरीही सर्वच वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी तसेच वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या कापडे ते कामथे रस्त्याच्या खराब कामासंदर्भात तसेच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला. सुमारे पावणेसहा कोटी रूपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची चर्चा राजकीय तसेच ठेकेदारी वर्तुळात होत असताना या रस्त्याच्या दूरवस्थेची जबाबदारी मात्र अभियंता आणि ठेकेदारावरच टाकली जात असल्याने मलिदा खाणारे काही पुढारी नामानिराळे राहण्याची चिन्हे दिसू लागली.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे राज्याचे मुख्य अभियंता सी. डी. फकीर यांनी पुणे येथील राज्याच्या विशेष गुणवत्ता नियंत्रकांमार्फत कापडे – कामथे रस्त्याच्या  दर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. मात्र, अद्याप या चौकशीचा अहवाल आणि त्यानुसार कारवाई होत नसल्याने केवळ चौकशीचा बनाव केल्याची शक्यता यामुळे चर्चेत येत आहे.

आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागामार्फत कापडे – कामथे रस्त्यावरील पाच पुलांच्या पुनर्बांधणीच्या सुमारे दोन कोटींच्या कामांच्या निविदा निघाल्या असून, त्याबाबत स्पर्धा होऊ नये, यासाठी त्या परजिल्ह्यातील दैनिकामध्ये प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये कालावधी संपल्यानंतर काम सुरू करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply