खालापुर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावरील कलोते गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 24) सकाळी मोकाट गुरांना वाचविण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुंबई बाजूच्या मार्गिकेवर आडवा झाला. तर त्याच्या धडकेने पुढे जाणारा टेम्पो पलटी झाला.
या अपघातात टेम्पो चालक सुधीर दौलत कोकाटे (वय 42, रा. लोणावळा) व आणखी दोन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर खोपोलीत प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम व पनवेल येथील खाजगीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एकाला लोणावळा येथे हलविण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खालापूर टोल नाक्यापासून थोड्याच अंतरावर कारचा मोठा अपघात झाला. हा अपघात डुलकी लागल्याने झाल्याची माहिती कार चालकानेच दिली. यात कार चालक गंभीर जखमी झाला तर कारचे मोठे नुकसान झाले. तर तिसर्या अपघातात द्रुतगती महामार्गावरील खोपोली बायपासजवळ महाकाय कंटेनर आडवा झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. काही वाहने खोपोलीतून मुंबई बाजूकडे रवाना करण्यात आली. कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.