पनवेल : प्रतिनिधी
पनवेल जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि. 12) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 383 प्रकरणे निकाली निघाली असून 1459 प्रकरणात पावणे पाच कोटी रुपये तडजोड वसूली झाली.
पनवेल जिल्हा न्यायालायत शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत भरवण्यात आली होती. तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश आर. जी. अस्मर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या वेळी पनवेल न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, पनवेल बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, अॅड. प्रल्हाद खोपकर इतर वकील व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय लोकअदालत मध्ये जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर व कनिष्ठ स्तरचे एकूण 11 कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्यासाठी 11 न्यायाधीश, 22 वकील, 68 कर्मचारी व चार विधी स्वयंसेवक यांची नेमणूक केली होती.
या लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रकरणांसोबत तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालये, एमएसईबी, एमटीएनएल, राष्ट्रीयकृत बँक व फायनान्स कंपनी कडील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणा पैकी 3183 प्रकरणे तडजोडीसाठी होती. त्यापैकी 383 प्रकरणे निकाली निघाली त्यातून तीन कोटी 66 लाख 24 हजार 145 रुपये वसूली करण्यात आली. वादपूर्व 4382 प्रकरणे होती त्यापैकी 1459 प्रकरणा मध्ये तडजोड करण्यात आली. त्यामध्ये एक कोटी सात लाख 87 हजार 698 रुपये तडजोडीने वसूल करण्यात आली.