तब्बल 480 अनधिकृत बिनशेती बांधकामे; एक कोटी 17 लाख 68 हजार रुपयांचा दंड
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात अनधिकृत बिनशेती बांधकामांचे (शेतघरे) पेव फुटले आहे. महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात तब्बल 480 अनधिकृत बिनशेती बांधकामे आहेत. त्यांना महसूल विभागाने एक कोटी 17 लाख 68 हजार 504 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पुणे, मुंबई या शहरापासून जवळ असल्याने अनेक विकासक सुधागड तालुक्यात जमीन व बंगलो, शेतघरे खरेदी-विक्री करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात बिनशेती बांधकामांचा हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.
कृषक भूखंडाचे अकृषकमध्ये रूपांतर करून घर बांधकाम करण्यास प्रशासनच्या वतीने रितसर परवानगी दिली जाते. मात्र सुधागड तालुक्यात गेल्या दहा-बारा वर्षांत अनेक ठिकाणी कृषक भूखंडावर शेकडो अनधिकृत शेतघरांचे बांधकाम झाले आहे.
सुधागड महसूल विभागातील उपलब्ध माहितीनुसार 5 मार्च 2022पर्यंत तालुक्यात 480 अनधिकृत बिनशेती बांधकामांची (अनधिकृत शेत घरांची) नोंद आहे. या सर्व अनधिकृत बिनशेती बांधकामांना एक कोटी 17 लाख 68 हजार 504 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 5 मार्चपर्यंत 249 अनाधिकृत बिनशेती बांधकामावर 33 लाख 71 हजार 566 रूपयांची दंड वसुली झाली आहे. अजूनही 231 अनधिकृत बांधकामांचे 83 लाख 95 हजार 938 रूपयांची दंड वसुली बाकी आहे.
अनधिकृत बिनशेती बांधकामांवर नियमित कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर दंडदेखील आकारण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक अनधिकृत बिनशेती बांधकामे थांबविण्यात आली आहेत. नवीन अनधिकृत बिनशेती बांधकामांना नोटीसादेखील दिल्या आहेत. प्रत्येकाने नियमांच्या अधीन राहून काम करणे आवश्यक आहे.
-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड