पेणमध्ये आत्मचिंतन व शक्तिप्रदर्शन मेळावा
पेण : प्रतिनिधी
कुक्कुटपालन पालन व्यवसायीकांना अनेक अडचणी, समस्या भेडसावत आहेत. कंपन्यांकडून मिळणारा पक्षी दर कमी मिळत असल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड कुक्कुट योध्दा सहकारी संस्था मर्यादित या संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी पेण तालुक्यातील शेणे येथे कुक्कुटपालन व्यवसायिकांचा आत्मचिंतन व शक्तिप्रदर्शन मेळावा आयोजित केला होता. त्याला रायगड, रत्नागिरी, खेड, ठाणे, पालघर, पुणे, मावळ, मुळशी, जून्नर, बारामती, जळगाव, अहमदनगर, नांदेड, अकोला, नाशिक आदी 15 जिल्ह्यातील कुक्कुटपालक शेतकरी उपस्थित होते.
अनिल खामकर यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू विषद केला. कोरोना काळातील थकीत हप्त्यांची थकीत कर्ज म्हणून नोंद न करता त्या कर्जाची पुनर्रचना करून योग्य कर्ज वाढवून देण्यात यावे, मांसल पक्षांना हमीभाव मिळावा, पोल्ट्री शेडसाठी लावण्यात येणारा ग्रामपंचायत कर रद्द करण्यात यावा, पोल्ट्रीसाठी आकारण्यात येणारे वीजबिल हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून आकारण्यात यावे, या व्यवसायातील पोल्ट्री शेड व जिवंत पक्षी यांना विमा संरक्षण देण्यात यावे, आदींसह विविध मागण्यांबाबत आगामी काळात संघटनेच्या वतीने सरकार व कंपन्या यांच्या विरोधात लढा देण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.