Breaking News

स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन होण्याची गरज -डॉ. रवींद्र मर्दाने

कर्जत पोसरी येथे महिला मेळावा

कर्जत : रामप्रहर वृत्त

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध कामांची जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक व गांभीर्याने पार पाडणार्‍या स्त्रिया कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत हातभात लावतात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही योगदान देतात परंतु त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने स्त्रियांच्या श्रमाचे मूल्यमापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना केले.

सह्याद्री सामाजिक संस्था, सद्भाव फाउंडेशन, मानवसेवा विकास संस्था व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने पोसरी जवळील चंद्रभागा फॉर्म येथे कर्जत तालुक्यातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर  व महिला बचतगट सदस्यांना विविध शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. मर्दाने बोलत होते. कोकण कृषी विद्यापीठामार्फत देण्यात येणार्‍या विविध प्रशिक्षणाची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

सद्भाव फाउंडेशनच्या समन्वयक सुनंदा लाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महिलांच्या सक्षमीकरणात बँकांचे फार मोठे योगदान असल्याच अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी यांनी सांगितले. कुशाल तितरे यांनी बँक ऑफ बडोदाच्या, शीतल शेवाळे यांनी कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक तुपे, सुचिता लोहकरे, उज्वला लाड, सुनिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, दंत शल्यचिकित्सक डॉ. प्रियंका तुपे-म्हापणकर, मंडळ अधिकारी भगवान बुरुड, तलाठी अश्विनी भामरे, तलाठी जयश्री मोरे उपस्थित होते. कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे यांनी आभार मानले.

या वेळी बँक ऑफ बडोदा तर्फे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात डॉ. करीम शेख, डॉ अब्दुल खान व डॉ प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या आरोग्याची विनामूल्य तपासणी करण्यात आली.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply