Breaking News

पालक संघर्ष समितीचे आजपासून साखळी उपोषण सुरू

इंग्लिश मिडीयम स्कुल गुण प्रकरण

कर्जत : प्रतिनिधी : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरीक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला वेळेवर कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी विविध प्रकारे आंदोलन केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर पालक संघर्ष समितीने गुरुवार (दि. 2) पासून शाळेच्या व्यवस्थापना विरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे.कर्जत शहरातील इंग्लिश मिडीयम स्कुलने 2019 मध्ये दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या अतिरिक्त विषयांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. त्यामुळे चित्रकलेच्या 54 आणि गायनाच्या 2 विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता पालकवर्ग संतप्त झाला आहेत. पालकांनी संघर्ष समिती स्थापन करून जोरदार उठाव केला असून, त्यांनी आपल्या पाल्यांसह 25 एप्रिल रोजी शाळेत येऊन शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना धारेवर धरले होते. त्यानंतर संतप्त  पालकांनी  स्कुलला टाळेह ठोकले. मुख्याध्यापक विनोद अळसुंदेकर आणि संस्थेचे सचिव श्रीकांत मनोरे यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गुण मिळणार याची खात्री शाळा व्यवस्थापन देत नसल्याने पालकवर्ग संतप्त झाला. त्यामुळे कर्जत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष झुलकरनैन डाभिया, कार्यकारणी सदस्य विजय जोशी, शमा काळे, देवीचंद ओसवाल हे तेथे उपस्थित झाले. परंतु आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही.दरम्यान, पालक संघर्ष समितीने आक्रमक होत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच 2 मेपासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन दिले होते. त्यानुसार गुरुवारी  पालक संघर्ष समितीने लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली. शाळेची विद्यार्थिनी श्रद्धा पोटे हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला.पालक संघर्ष समितीचे युसूफ खान, कैलास पोटे, विजय जगताप,  पंकज ओसवाल, अमित खैराट, चंद्रकांत दगडे, सुभाष पाटील, निखील गुप्ता, प्रकाश चव्हाण, राजेश गायकवाड, चंद्रकांत झुंजारराव, मृणाल कदम, दर्शना दगडे, रेखा भापेकर, कल्याणी पोटे आदींनी गुरुवारी विद्यार्थ्यांसह साखळी उपोषणास सुरुवात केली.

पालक संघर्ष समितीच्या मागण्या एलिमेंटरी इंटरमिडीएट व इतर विविध कला गुणांचे इयता 10 वी च्या 56 विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणे, शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे, दरवर्षी वाढविण्यात येणार्‍या फी वाढीवर निर्बंध आणणे, शिक्षकांकडून विद्यार्थ्याना होणारा त्रास थांबविणे व भेदभाव दूर ठेवणे, दरवर्षी नियुक्त केल्या जाणार्‍या पालक प्रतिनिधीना व शाळा समितीवरील पालकांना विशेष अधिकार मिळणे, शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासून प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करणे, शाळेचे मुख्याध्यापक व बेजबाबदार संचालक मंडळावर कारवाई होऊन संचालक मंडळाने राजीनामा देणे आदि मागण्या पालक संघर्ष समितीने केल्या आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply