कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर येणार पहिलाच सण होळीचा आहे. पनवेलमध्ये होळीमध्ये जाळण्यासाठी लाकडाबरोबरच लागणार्या शेणींना मोठ्या प्रमाणात मागणी आली असल्याची माहिती करंजाडे येथील तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबियांनी दिली. त्यामुळे झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा हा उद्देश या वेळी साध्य होताना दिसत आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. आता कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यावर्षी सगळीकडे होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. यंदा गुरुवारी (दि. 17) होळी आहे. पनवेल परिसराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठमोठ्या रहिवासी सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक सोसायटीत होळी साजरी केली जाते. होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडून त्याची लाकडे वापरून पर्यावरणाची केली जाते. पण आता झाडेच कमी झाली असल्याने होळीला लाकडे मिळत नाहीत. त्यामुळे लाकडांना पर्याय म्हणून शेणींचा वापर केला जातो. त्यामुळे पनवेल परिसरात शेणींची मागणी वाढली आहे. इतर वेळी दोन रुपयांना विकली जाणारी शेणी बाजारात तीन ते पाच रुपयांना मिळत आहे.
पनवेलच्या करंजाडे परिसरात असलेल्या तबेल्याचे मालक भरवाड कुटुंबीयांचा शेणी विकण्याचा व्यवसाय आहे. भावनागरहून 40 वर्षांपूर्वी हे कुटुंब पनवेलमध्ये आले. या कुटुंबात झीलू लाखा भरवाड सर्वात ज्येष्ठ महिला आहेत. त्यांची सून मिना भुपा भरवाड या शेणी बनवतात. दिवसाला हजार शेणी त्या बनवितात. आता 12 म्हशी आहेत. पूर्वी जास्त असल्याने 26-27 घमेली शेण असायचे. त्यावेळी त्यांची नातसून खोपा भरवाड व इतर कुटुंबीय त्यांना मदत करीत असे. आता दोन दिवसांत पाच हजार शेणींची विक्री झाली आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत यापेक्षा जास्त विक्री होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पर्यावरण संवर्धनाचा उद्देश साध्य
होळीसाठी लाकडे वापरून पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढते. त्याचा परिणाम पर्जन्यावरही होत असल्याचे दिसून आले आहे. होळीसाठी शेणींचा वापर सुरू होणे हे चांगलेच आहे. याशिवाय गाईच्या शेणापासून मशीनवर बनवलेली होळी स्टिक ही वापरू शकतो. दोन फुटाची ही स्टिक 700 ग्राम ते एक किलोच्या आसपास असते. एक स्टिक 10 रुपये दराने मिळते. एका सोसायटीला 75 ते 100 अशा स्टिक पुरेशा होतील. शक्य झाल्यास एक गाव एक होळी, किंवा एक आळी एक होळी अशी संकल्पना राबवायला हवी, यामुळे ‘झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा’, हा उद्देश साध्य व्हायला मदत होईल.