Breaking News

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल

कोविड रुग्णांना मोठा दिलासा

अलिबाग ः प्रतिनिधी
राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर 45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या तीन टँकरसह ही ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी (दि. 26) सकाळी 11.30 सुमारास कळंबोली येथे दाखल झाली.
विशाखापट्टणम् येथून वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेलजवळील कळंबोली येथून 10 ट्रकची ऑक्सिजन एक्स्प्रेस 19 एप्रिल रोजी रवाना करण्यात आली होती. ही ऑक्सिजन एक्स्प्रेस पुन्हा कळंबोलीत आली असून, कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधील 10 टँकरपैकी तीन नागपूर येथे, चार नाशिक येथे आणि उर्वरित तीन टँकर कळंबोली (पनवेल) येथे उतरविण्यात आले.
    कळंबोली येथे आलेले टँकर्स रिलायन्स जामनगर येथून आलेले आहेत. प्रत्येकी 15 मेट्रिक टन असे एकूण 45 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे टँकर्स उच्चस्तरीय समितीमार्फत रवाना करण्यात येत असून, अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील दोन टँकर मुंबईसाठी, तर एक टँकर पुण्यासाठी रवाना करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये पाठविण्यात येणार्‍या टँकरपैकी एक सेव्हन हिल रुग्णालयासाठी, तर दुसरा रबाळे (नवी मुंबई)साठी पाठविण्याचे नियोजन आहे. संबंधित ऑक्सिजन टँकर परिवहन विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्या देखरेखीखाली परिवहन विभागामार्फत सुरक्षितरित्या रवाना करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे यांनी दिली.
ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोली येथे आणणे व मेडिकल लिक्विड ऑक्सिजन टँकर्सचे नियोजन  करण्यासाठी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर, कळंबोली स्टेशन मास्तर डी. बी. मीना, एरिया मॅनेजर राजेश कुमार, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे आदींनी समन्वय साधला.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply