
पोलादपूर : प्रतिनिधी
राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या गुहागर आगाराची गुहागर ते बोरीवली एसटी बस बुधवारी (दि.15) सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर शहरातील कमानीजवळील रस्त्यालगतच्या चरात कलंडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, पोलादपूर शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ खणलेल्या चरांमुळे महामार्गाची साईडपट्टी अरूंद झाली आहे. याठिकाणी बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास गुहागर ते बोरीवली एसटी बस (एमएच-14,बीटी-2998) कलंडली. या अपघातात काही प्रवाशांच्या हातापायांसह तोंडाला व खांद्याला मुका मार बसल्याचे दिसून आले. अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक राज पवार, नगरसेवक उमेश पवार आणि सहकार्यांनी तातडीने प्रवाशांना अन्य वाहनात बसविण्यास सहकार्य केले.