मुंबई ः प्रतिनिधी
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर देऊन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
राऊतांच्या टीकेवर जलीलांचा पलटवार
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने ही ऑफर धुडकावून लावली आहे, मात्र या संदर्भात राऊतांनी केलेल्या टीकेवर एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिहल्ला केला. भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा सर्व मुस्लीम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे विसरून जा. तुम्ही शिवरायांचा उपयोग फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी करता. औरंगजेब कोणत्या काळात होते आणि आजचा काळ काय आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे, असे जलील म्हणाले. ज्या शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधात झाला होता ती शिवसेना फक्त सत्ता उपभोगण्यासाठी पुन्हा त्यांच्यासोबतच जाऊ शकते, तर तुम्ही किती खालच्या पातळीवर गेला आहात हे दिसतेय, असेही जलीलांनी म्हटले.
तरीही जनता भाजपलाच निवडून देईल -फडणवीस
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. या वेळी त्यांनी शिवसेनेला टोलादेखील लगावला. भाजपला हरवण्यासाठी सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण कोणीही एकत्र आले तरीही भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे आणि ती भाजपलाच निवडून देईल. फक्त आता या सगळ्या आघाडीमध्ये शिवसेना काय करणार? याकडे आमचे लक्ष असेल, असे फडणवीस म्हणाले. एमआयएमला भाजपची बी टीम बोलले जात होते, परंतु आता त्यांच्याशी युती करण्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ते हारले की त्यांना ईव्हीएम दिसते, बी टीम दिसते. हरल्यानंतर अशा अनेक गोष्टी ते बोलत असतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नसते. आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसेही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेले आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे. त्याचा परिणाम आहे का पाहूयात, असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला. एमआयएम जर त्यांच्याशी जोडली जात असेल तर आम्हाला काही फरकत पडत नाही. याचे कारण लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. लोक आमच्या कामाला पाहून मतदान करतात. त्यामुळे ते सर्वजण एकत्रित आले तरी आम्हाला फरक पडत नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.
इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे निधन झाले म्हणून राजेश टोपे त्यांच्याकडे गेले होते. अशा वेळी राजकीय चर्चा अभिप्रेत नाही. त्यामुळे अशा चर्चेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही.
-जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष
आम्हाला कट्टरवाद मान्य नाही. सर्वधर्मसमभाव हवा आहे.
-बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते