पनवेल ः रामप्रहर वृत्त
द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलने 1 डिसेंबर 2021पासून 11 मार्च 2022पर्यंत देशातील सर्व राज्यांचा 19 हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास केला असून नुकताच या प्रवासाचा समारोप खारघर येथे झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी त्यांनी या मोहिमेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, अनिता पाटील, नेत्रा पाटील, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, जिल्हा चिटणीस गीता चौधरी आदी उपस्थित होते. द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल ही 101 दिवसांची रोड ट्रिप मोहीम होती, जी कोविडमुळे प्रभावित झालेल्या लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना मदत करण्यासाठी, सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, भारत आणि आपली संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, पाककृती अशा विविध बाबतीत प्रेरक ठरली. या मोहिमेदरम्यान रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, एनजीओ क्षेत्र आणि स्टार्ट अप्स आणि लहान व्यावसायिक समुदायांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 800पेक्षा जास्त समविचारी लोकांच्या भेटी झाल्या व त्यामध्ये एकमेकांचे विचार मांडण्यात आले. सपोर्ट युअर बिझनेस या आशयाच्या माध्यमातून सर्व पार्श्वभूमीतील लोकांना सक्षम करणे, त्यांच्यासाठी त्यांच्या व्यवसायाचा प्रचार आणि वाढ करण्यासाठी नेटवर्क स्थापन करण्याचे ध्येय आहे जे एक नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे ज्याचे नेतृत्व संस्थापक संचालक रिंकी वनमोरे, सुश्री मदीहा शेख आणि कौस्तव घोष करतात. मोहिमेचा उद्देश लहान व्यवसायांना पाठिंबा देणे आणि त्यांचे ब्रँड आणि प्रयत्न ओळखणे हा आहे. द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल या मोहिमेमध्ये एक संघ असून त्यामध्ये कौस्तव घोष संस्थापक, लक्ष्मी सोरते सहसंस्थापक, आर्या नायर जनसंपर्क आणि विपणन, भाविक देशमुख नेव्हिगेटर, अनित कौर बंगा विचारवंत, संशोधन आणि विकास, रितांशू शर्मा मीटिंग समन्वयक, सावराब समता वेबसाइट विकसक, तरुण मिश्रा ग्राफिक डिझायनर-व्हिडीओ मेकर, अभिषेक वाळेकर व शीतल सिरसीकर वाहन ब्रँडिंग म्हणून काम पाहतात.