Breaking News

वाझेंभोवती फास आवळला

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आढळलेली गाडी आणि त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पदरीत्या झालेल्या मृत्यूप्रकरणी एएनआय अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात वाझेंकडे संशयाची सुई वळतच होती. या अटकेतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे गुन्हेगारी घटनांना ऊत आला असून दुसरीकडे महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनाही वारंवार घडत आहेत. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस खात्याने आपले कर्तव्य चोखपणे बजावून कारवाई करणे अपेक्षित असते. ‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ अशी महाराष्ट्र पोलिसांची ख्याती राहिलेली आहे, पण सध्या जे काही चाललंय ते पाहता पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. आता तर पोलीसच गुन्हेगारी घटनांमध्ये सामिल असल्याचे सचिन वाझे प्रकरणावरून समोर आले आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या कारकिर्दीला यापूर्वीही गालबोट लागलेले आहे. वाझेंसह 14 पोलीस कर्मचार्‍यांना 2004मध्ये निलंबित करण्यात आले होते. या सर्वांवर 2002च्या घाटकोपर बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता. निलंबन काळ संपल्यानंतर वाझेंनी 2007मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला. मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2020मध्ये कोरोना महामारीच्या काळात वाझे पुन्हा पोलीस दलात परतले आणि आता पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आढळलेली गाडी आणि त्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरीत्या झालेल्या मृत्यू प्रकरणात वाझेंचे नाव समोर आले आहे. ही बाब ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर आणली होती. भाजपच्या दबावानंतर सुरुवातीला वाझेंची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली, मात्र मनसुख हिरेन यांच्या पत्नीने वाझे यांनी माझ्या पतीची हत्या केली असल्याचा आरोप केला असल्याने वाझेंची बदली नको तर त्यांचे निलंबन करून त्यांना अटक करा, अशी मागणी भाजपने लावून धरली होती. तरीही आधी चौकशी मग शिक्षा असा पवित्रा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारने वाझे यांची जणू पाठराखण केली होती. अशातच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) अटक करू शकेल अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती, मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे असा युक्तिवाद करीत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असे सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझेंची एनआयएने शनिवारी 13 तास मॅरेथॉन चौकशी केली. अखेर वाझेंना अटक करण्यात आली. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यामुळे येत्या काळात काय काय बाहेर येतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply