अलिबाग : प्रतिनिधी
अधिपरिचारीका प्रशिक्षणास 2017 पासून सुरुवात करुन 2019-20 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिपरिचारिकांना 18 महिन्याचे नियुक्तीपत्र मिळत नसल्याने समाजक्रांती आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात प्रशिक्षण पुर्ण करणार्या अधिपरीचारीकांचाही समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. 2019-20 मध्ये त्यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या बंधपात्र अधिपरिचारिकांनी संबंधित आरोग्य अधिकारी व कार्यालय येथे वारंवार भेट देऊन अर्ज, विनंत्या केल्या. पण त्यांना नियमाप्रमाणे 18 महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. या संदर्भात समाजक्रांती आघाडीच्या वतीने गेल्या महिन्यात आंदोलन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या विनंतीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र महिन्याभरात प्रशासनाकडून कुठलीच हालचाल झाली नसल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेहनत घेऊन अभ्यास करुन आम्ही उत्तीर्ण झालो आहोत. परंतु, आज आम्ही बेरोजगार आहोत. प्रशिक्षण चालू असतानासुद्धा करोना महामारीच्या आपत्तीतदेखील आम्ही रुग्णसेवेचे काम केले आहे. मात्र, आता नियुक्ती मिळत नसल्याने आम्ही आर्थिक व मानसिक तणावात आहोत. त्यामुळे नाईलाजाने आमच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ ओढवली आहे. आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याकरीता हे आंदोलन करत असल्याचे यावेळी उपस्थित अधिपरिचारिकांनी सांगितले. विशेष म्हणजे पुणे आणि लातूर येथील प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अशाच अधिपरिचारिकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहेत. त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळावा या दृष्टीने राज्य शासनाने कार्यवाही करावी. शासनाने प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अधिपरिचारिकांना त्वरित 18 महिन्यांचे नियुक्तीपत्र द्यावे, अशी मागणी अधिपरिचारिकांनी केली आहे.