Breaking News

कर्जत शहरात सायकल रॅली

कर्जत : बातमीदार

माझी वसुंधरा अभियानानिमित्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने शहरात पर्यावरण रॅली काढण्यात आली होती. कर्जत शहरातील अनेक सायकलपटूंनी या रॅलीत सहभागी होऊन नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

कर्जत शहरातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे, यासाठी नगर परिषदेने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंना नगर परिषदेकडून पर्यावरण जागृतीचे संदेश देणारे टी-शर्ट देण्यात आले होते. ही रॅली कचेरी रोडने मुद्रे नाना मास्तर नगर, गुरूनगर, स्वप्ननगरी, आमराई, दहिवली, आकुरले मार्गे पुन्हा कर्जत शहरात आली. शहरातील बाजारपेठ, महावीरपेठ, स्टेशन रोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे नगर परिषद कार्यालय येथे आली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती विषयक पथसंचलन केले. नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका मधुरा चंदन, आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे यांच्यासह शहरातील लहान थोर सायकलपटू आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक घेऊन नगरपालिका कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.

पर्यावरण राखण्यासाठी नगर परिषदेने वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. शहरात 2021 मध्ये पाच हजार झाडे लावली असून यावर्षी 25 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे.

-डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद, कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply