पनवेल : बातमीदार
स्वतःचे घर बांधण्यासाठी 51 वर्षीय व्यक्तीला जागा देतो असे सांगून तब्ब्ल 61 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुब उस्मान काझी हे तळोजा फेज 1 येथे राहत असून ते मुंब्रा येथे राहत असताना त्यांची ओळख रफिक आदम भाटकर यांच्याशी झाली होती. भाटकर हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. काझी यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा घ्यावयाची असल्याने त्यांनी तसे रफिक आदम भाटकर यांना सांगितले होते. 2011 मध्ये काझी हे कुवेत येथे असताना रफिक भाटकर याने त्यांना फोन करून एका ओळखीच्या पार्टीकडे भुखंड क्रमांक 5, सेक्टर 17, फेज 2, तळोजा येथे 100 स्वे. मीटर जागा असून ती जागा विक्रीस असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काझी यांनी ती जागा विकत घेण्याचे ठरवले होते. जागेची किंमत 40 लाख असून जागेची किंमत म्हणून वेळोवेळी रफिक भाटकर याला एचडीएफसी बँकेचे व पत्नी शबाना हिचे डिसीबी बँकेचे कोरे चेक दिले होते. त्यानंतर भाटकर याने 40 लाख रुपये खात्यावरून काढून घेतले होते. त्यावेळी काझी हे कुवेत येथे असल्याने ते भारतात येईपर्यंत ती जागा रफिक भाटकर याला त्याच्या नावावर करून घेण्यास त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ती जागा त्याने स्वतःच्या नावे करून घेतली होती. काझी जेव्हा भारतात परत आले व ती जागा स्वतःच्या नावावर करण्याबाबत रफिक भाटकर याला त्यांनी विचारणा केली असता, त्यावेळी त्याने या जागेचा भाव वाढल्याने आणखी पैशांची मागणी केली. त्यानुसार सन 2012 ते 2014चे दरम्यान काझी यांनी पत्नीचे 14 तोळे सोन्याचे दागिने हे रफिक भाटकर यांच्याकडे दिले. तसेच आणखीन रक्कम रफिक भाटकर यास दिली होती. अशी एकूण 59 लाख रुपये रक्कम व दोन लाख 80 हजार रुपये किंमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एम.आर. कंन्स्ट्रक्शनचे मालक मोहंमद रफिकआदम भाटकर (वय 56), राहील रफिक भाटकर, (वय 32, मुंब्रा), आजीम होडेकर, (वय 48, मुंब्रा), जावेद अब्बास होडेकर, (वय 46, मुंब्रा), सुनिल कुमार दत्ता, सोनी मित्तल होम्स प्रा. लि.चे मालक (नाव, पत्ता माहीत नाही) यांना दिले. मात्र त्यांनी त्या बदल्यात जमीन न देता आपसात संगनमत करून काझी यांची फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.