पालकांनी केले उपक्रमाचे कौतुक
पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, एनसीईआरटी पुणे, प्रथम संस्था व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पेण उर्दू शाळा क्र. 5 मध्ये विद्यार्थ्यासाठी दोन दिवशीय शाळापूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
कोविड काळामध्ये बालवाड्या बंद होत्या. त्यामुळे झालेले शैक्षणिक नुकसान (लर्निंग लॉस) भरून काढण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक क्षमता तसेच भाषा विकास क्षमता अवगत होण्यासाठी राबविण्यात आलेल्या या शाळापूर्व प्रशिक्षण शिबिरात एकूण 18 केंद्रातील प्रत्येकी दोन असे तब्बल 36 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. विनोद म्हात्रे व अतीता पाटील यांनी सुलभक म्हणून तर निलेश मानकवळे व करुणा म्हात्रे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
शिबिराच्या दुसर्या दिवशी बाळमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पेण तालुक्यातील दाखलपात्र 20 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी दोरी उड्या मारणे, चित्रात रंग भरणे, आपल्या परिवारातील सदस्यांची ओळख देणे, बादलीत चेंडू टाकणे, वस्तू मोजणे अक्षरांचे वाचन करणे, क्रम लावणे अशा विविध क्रिया केल्या. या तालुका प्रशिक्षणानंतर केंद्रस्तरीय प्रशिक्षण व त्यानंतर शाळास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांनतर 12 आठवड्यामध्ये माता पालक समूहातून दाखलपात्र विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम कृती करून घेऊन त्यांच्यामध्ये अपेक्षित सर्व क्षमता विकसित केल्या जाणार आहेत. याची पुन:पडताळणी म्हणून शाळा स्तरावर दुसरा मेळावा घेण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत असून उपस्थित पालकांनी शिक्षकांचे आभार मानले.