कोरोना काळात विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांची उपस्थित वाढावी व अध्ययन आणि अध्यापन हसतखेळत व्हावे यासाठी बनोटी गावातील राजिप शाळेने 2021-22 या शैक्षणिक वर्षात विविध अभिनव उपक्रम राबविले. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून ते या नवोपक्रमात गुंतून गेले आहेत. शाळेच्या नवोपक्रमशील शिक्षिका तृप्ती रवींद्र सावंत यांनी शाळेमध्ये हा आमूलाग्र बदल घडून गुणात्मक विकास करून दाखविला आहे. ही शाळा इयत्ता पहिली ते चौथीची आहे. इतक्या लहान वयोगटातील हे चिमुरडे विविध उपक्रमात हिरहिरीने सहभागी होत असून त्यांना शाळेची गोडी लागली आहेत.
वाचन अभियान उपक्रम
बढे भारत अभियाना अंतर्गत शंभर दिवस वाचन अभियान उपक्रम शाळेमध्ये यशस्वीपणे राबविला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गटानुसार एक ते दोन व तीन ते चार याप्रमाणे ग्रंथालयातून पुस्तक वाचण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. विद्यार्थी आपल्या आवडीने ग्रंथालयातील पुस्तक निवडतात व सांगितलेल्या कथा, कविता व संवाद वाचतात. यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
भाषा संगम
‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ या अभियानांतर्गत भाषा संगम हा उपक्रमदेखील शाळेत राबविला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना दुसर्या एका राज्याची भाषा शिकवली जाते. विद्यार्थ्यांना कोकणी भाषा शिकवली. विद्यार्थी कोकणी भाषेतील दैनंदिन जीवनातील वाक्य बोलतात. विद्यार्थी शालेय वयापासूनच दुसर्या राज्याची भाषा शिकल्यामुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
गोष्टींचा शनिवार
शाळेत दर शनिवारी विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार चित्रांसहित गोष्टी ऐकवल्या व वाचून दाखविल्या जातात. विद्यार्थी त्या कथा श्रवण करतात व आपल्या भाषेमध्ये पुन्हा कथन करतात तसेच गोष्टींवर आधारित कृतिपत्रिकादेखील सोडवून घेतली जाते. यामुळे विद्यार्थी आनंददायी पद्धतीने नवीन गोष्टी शिकतात, स्वतः सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या श्रवण, भाषण कौशल्यात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास चांगल्या प्रकारे झाला आहे. विद्यार्थ्यांना गोष्टीतून चांगला बोध मिळतो. तो बोध नकळतपणे त्यांच्या जीवनात रूजलेला पाहायला मिळत आहे.
शालेय परसबाग
शाळेच्या परिसरात विविध प्रकारची फळझाडे व भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. भाज्या लागवड करतांना कशाप्रकारे त्यांची लागवड करावी, रोपे कशी लावावी, रोपाची काळजी कशी घ्यावी, रोपांची वाढ कशी होते या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना नियमित दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना स्वानुभव मिळतो. तसेच यातून परिसर अभ्यासातील घटकाचा अभ्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून घेता येत आहे. वनस्पतींचे अवयव कोणते, वनस्पतींची वाढ कशी होते, वाढीसाठी आवश्यक घटक कोणते, याबद्दल विद्यार्थी माहिती सांगू लागले आहेत. तसेच ‘झाडे लावा झाडे जगवा‘ हा संदेश आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये रुजला आहे.
योगाभ्यास
विद्यार्थ्याचे अवधान केंद्रित करून अभ्यासातील गती वाढवणे, विद्यार्थ्यांना सदृढ बनविणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे व शरीर लवचिक बनविणे यासाठी प्रत्येक शनिवारी शाळेत विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवली जातात. विद्यार्थी उत्तम प्रकारे योगासने करतात व दररोज त्याचा घरी सरावसुद्धा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारशक्ती तर वाढली आहेच. त्याचबरोबर ध्यानधारणेमुळे लक्ष केंद्रित करणे सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांची अध्ययनातील गती वाढण्यास त्याचा खूप उपयोग झाला आहे.
इंग्रजी कॅरम उपक्रम
इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना सुलभपणे बोलता यावी, विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शब्द संपत्तीची वाढ व्हावी, विद्यार्थ्यांनी हसत खेळत इंग्रजी शिकावे, यासाठी तृप्ती सावंत यांनी इंग्रजी कॅरमची निर्मिती केली. विद्यार्थी इंग्रजी कॅरमचा वापर करून हसत खेळत इंग्रजी शब्द संपत्तीत वाढ करू लागले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक इंग्रजी अल्फाबेटवरून शब्द सांगता येऊ लागले. विविध गावे, जागा, प्राणी, पक्षी यांची नावे सांगतात. शब्दसंपत्ती वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषेची आवड निर्माण झाली. त्यांची इंग्रजी भाषेची भीती दूर झाली.
-धम्मशील सावंत, खबरबात