पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का) मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने या पाण्यातून वाहनचालकांना गाडी हाकावी लागत आहे. तसेच अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. याबद्दल नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सिडकोकडे तक्रार केल्यानंतर अखेर नाल्यात अडकलेला गाळ हाताने काढण्यास सुरुवात झाली आहे.
गाढी नदीच्या काठावर हा भुयारी मार्ग 10 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. यामध्ये सिमेंटचे चार ब्लॉक तयार करून बसवण्यात आले आहेत. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात त्या ठिकाणी मार्गातील पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. या गटाराची उंची ही आतील सिमेंट ब्लॉकपेक्षा जास्त असल्याने आत साठलेले पाणी तसेच राहत आहे. याशिवाय त्याठिकाणी वाहून येणारी माती नदीच्या पात्रात न जाता तेथील दुभाजका जवळील जाळीला अडकून राहून गटार मातीने भरून जाते. त्यामुळे वरून येणारे पाणी ब्लॉकमध्ये जाते. गटारातील माती काढण्यासाठी बसवलेली जाळी काढण्याची सोय नाही. त्यामुळे अखेर लोखंडी जाळीत हात घालून हाताने माती काढण्यात येत आहे. हात जाळीतून आत जात नसल्याने पूर्ण माती काढणे शक्य नाही. त्यामुळे चार-पाच दिवसांनी पुन्हा ते गटार भरणार आणि पाणी ब्लॉकमध्ये जाऊन वाहनचालकांना त्रास होणार आहे. यावर कायम स्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे त्याकडे सिडको आणि रेल्वेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सांगितले.
भुयारी मार्गाच्या गटारात बसवलेली जाळी फिक्स आहे ती जर काढण्याची सोय असती तर गटार साफ करणे सोयीचे झाले असते. आम्ही दोनदा हाताने साफ करून घेतले. पण आठ दिवसांत पुन्हा भरते. रेल्वेने ती जाळी काढता येणारी बसवल्यास हा प्रश्न सुटेल.
-संतोष साळी, एईई, सिडको