सामन्यांच्या दिवशी मैदानालगतचा रस्ता इतर वाहनांसाठी बंद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात आयपीएलचे क्रिकेट सामने होत असून ज्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या वर्षी प्रथमच पार्किंगसाठी ‘क्यूआर कोड’ची सुविधा देण्यात आली आहे.
तिकिटावरील कोड स्कॅन करून आपली पार्किंग कुठे आहे हे शोधता येणार आहे. त्यामुळे पार्किंगसाठीची भटकंती व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी होणार नाही असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. ठाणे-बेलापूर मार्गालगत सेवा रस्त्यावर या मैदानाची दोन प्रवेशद्वारे आहेत. शिवाय पार्किंगसाठीचे प्रवेशद्वारही येथेच आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार हा रस्ता अन्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येईल व ही वाहतूक ठाणे-बेलापूर आणि नेरुळमधील अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 20 सामने हे डॉ. डी. वाय. पाटील नेरुळ येथील मैदानात होणार आहेत. यातील चार सामने दिवसा तर 16 सामने दिवस-रात्र असणार आहेत. या मैदानात 55 ते 60 हजार इतकी प्रेक्षक क्षमता असून दीड ते पावणेदोन हजार वाहनांचा अंदाज आहे. डॉ. डी. वाय. पाटील प्रशासनाच्या वाहनतळाची क्षमता केवळ 500 वाहनांची आहे. हे वाहनतळ फक्त महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आरक्षित असणार आहे. त्यामुळे इतर प्रेक्षकांसाठी नेरुळ सेक्टर 19 येथील भीमाशंकर मैदान आणि रहेजा मैदानात वाहनतळ करण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलीस दलही तैनात
हे 20 सामने शिस्तीत पार पडावेत, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस महासंचालकांकडून अतिरिक्त कुमकही देण्यात येणार आहे. याशिवाय 200 पेक्षा अधिक खासगी सुरक्षारक्षक असणार आहेत. डॉ. डी. वाय. पाटील मैदान प्रशासनाचे 400 सुरक्षारक्षक असणार आहेत. तीन पोलीस आयुक्त, 12 साहाय्यक पोलीस आयुक्त, 45 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उप निरीक्षक, 1200 पोलीस कर्मचारी ज्यात 200 महिला कर्मचारी असा 1300 पेक्षा अधिक जणांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय राखीव पोलीस बळ, जलद गती पथक, दंगलविरोधी पथक तैनात असणार आहे. याशिवाय या मार्गावर अतिरिक्त सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.