Breaking News

व्यावसायिकाकडून खंडणी उकळणार्या दोघांना अटक

पनवेल : वार्ताहर

खारघर भागात बिल्डिंग मटेरीयल सप्लाय करणार्‍या व्यावसायिकाला त्याचे मटेरीयल सप्लायचे काम बंद करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून अडीच लाख रुपयांची रोख रक्कम आणि आय फोन-10 उकळणार्‍या दोघांना खारघर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नितीन चावला व साकिब खान अशी या दोघांची नावे असून ते दोघे खारघर सेक्टर-36 मधील इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या साईटवर सुपरवाझर आणि इंजिनियर म्हणून कार्यरत होते.

या प्रकरणातील तक्रारदार बिल्डिंग मटेरीयल सप्लायचे काम करीत असून सध्या तो खारघर सेक्टर-36 मधील साई पॅराडाईज ग्रुपच्या वतीने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बिल्डिंग मटेरीयल सप्लाय करीत होता. साई पॅराडाईज ग्रुपच्या बांधकाम साईटवर कार्यरत असलेले सुपरवाझर नितीन चावला व इंजिनियर साकिब खान हे दोघेही मालाची प्रत चेक करून, तसेच वजन करूनच या व्यावसायिकाचे डंपर आतमध्ये सोडत असत, मात्र गत फेब्रुवारी महिन्यामध्ये नितीन चावला आणि साकिब खान या दोघांनी या व्यावसायिकाला बांधकाम साईटवर बोलावून त्याच्याकडून चांगल्या प्रतीचे मटेरीयलचे सप्लाय होत नसल्याचे सांगून त्याच्या सप्लायचे काम बंद करण्याची धमकी दिली होती.

तसेच त्याच्याकडून जे मटेरीयलचे डंपर पाठविण्यात येत होते, त्या डंपरमधील माल जाणीवपूर्वक रिजेक्ट करून ते परत पाठवित होते. याबाबत व्यावसायिकाने विचारणा केल्यानंतर या दोघांनी त्या व्यावसायिकाला मटेरीयल सप्लायचे काम सुरू ठेवण्यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची मागणी केली, अन्यथा त्याचे मटेरीयल सप्लायचे काम बंद करण्याची धमकी दिली होती. या वेळी साकिब खान याने आय फोन-10 एस या मोबाईल फोनची देखील मागणी केली. त्यामुळे व्यावसायिकाने घाबरून 99 हजार 900 रुपये किंमतीचा मोबाईल फोन खरेदी करुन हा मोबाईल फोन व दोघांना प्रत्येकी 50-50 हजाराची रक्कम दिली, मात्र मार्च महिन्यामध्ये पुन्हा या दोघांनी प्रत्येक गाडीमागे 500 रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर नितीन चावला व साकिब खान हे दोघे व्यावसायिकाला वारंवार फोनवरून धमकावत होते. त्यामुळे गत आठवड्यात व्यावसायिकाने या दोघांच्या मागणीनुसार आणखी दीड लाख रुपयांची रोख रक्कम त्यांना दिली, मात्र त्यानंतर या दोघांनी प्रत्येक महिन्याला ठरल्याप्रमाणे पैसे आणून देण्यासाठी तसेच या प्रकाराबाबत कुणाला काही सांगू नये यासाठी धमकावण्यास सुरुवात केली. या दोघांकडून वेगवेगळ्या पद्धतीने धमकावण्याचे सत्र सुरूच राहिल्याने त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने अखेर खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नितीन चावला व साकिब खान या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply